Labels

Monday, June 17, 2013

I HATE RAIN !!!

पाऊस  सगळ्यांनाच आवडतोच असं नाही. काहींच्या जुन्या गाडलेल्या आठवणी पावसाबरोबर जाग्या होतात…. त्याचा त्यांना त्रास होतो… आणि त्यांच्या तोंडून नकळत विरहवेदना बाहेर पडतात. अभीरही अशांतलाच एक !! पाऊस आला की त्याच्या श्रुतीसोबतच्या आठवणी पुन्हा जाग्या होतात पण आता त्यांना राधाच्या आठवणींचं त्या वेदना सुसह्य करणारं औषध मिळालं आहे. 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ही मालिका माहित असेल्यांना हे संदर्भ आणि I Hate Rain माहित असेल पण समजा माहीत नसलं तरीही या कवितेतल्या भावना नक्कीच समजू शकतील, कारण… 'कविता ह्या समजायच्याच नसतात, समजायच्या असतात त्या भावना…' :)

माझी मैत्रीण निकिता आवारे हिने व्यक्त केलेल्या अभीरच्या या पाऊसवेदना….


I HATE RAIN 
पावसाची संततधार
गोठवून टाकणारा गार वारा 
माती आणि धारांच्या मीलनाच्या आनंदाने बेभान होऊन 
रस्त्यांवरून फेसाळत वाहणाऱ्या त्या इवल्या इवल्या सरिता
हे… 
हे सगळं चुकवत 
मी दुकानाच्या शेडच्या आडोशाने उभं रहावं 
आणि आपल्याच आनंदात भुर्रकन जाणाऱ्या एखाद्या गाडीनं 
जाताना मला नखशिखांत चिखलाचा अभिषेक घडवावा 
You know what Radha 
I  HATE RAINS… !!!

ते आभाळअश्रू झेलून चिल्ल्यापिल्ल्यांनी मनसोक्त नाचताना 
मला मात्र 
फक्त त्यांच्या पायाखालचं चिखल दिसावं 
कुणी पावसात भिजायला मिळावं म्हणून छत्री घरी मुद्दाम विसरावी 
आणि मी मात्र बरसणाऱ्या सरींवर बहिष्कार म्हणून 
स्वतःच्या खोलीत बंद व्हावं 
प्रेमात पडलेल्या माझ्या मित्राला
कोसळणाऱ्या थेंबांत सप्तसुरांचा नाद गवसावा
पण मला नेहमी 
पत्र्यावर आपटून पाण्याने 'ताड् ताड्...' असा माजवलेला तांडवच दिसावा…. 
You know what Radha 
I  HATE RAINS… !!!

पावसाच्या येण्याबरोबर मग
चोरपावलांनी श्रुतीची आठवण यावी 
मित्राच्या पावसाची सरगम 
अनाहूतपणे कानी वाजू लागावी 
आणि थेंबाथेंबागणिक 
तिच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण ,मनावर कडकडून कोसळावा… 
आकाशाचं ते रुदन माझ्याच विरहकळांचा प्रतिध्वनी वाटावा… 
वाढत जाणाऱ्या पावसाबरोबर सगळं कसं असह्य व्हावं 

अचानक पाऊस थांबावा… 
पाऊसधारांत न्हाऊन निघून हवा पण अगदी स्वच्छ भासावी… 
इतका वेळ मिटलेले डोळे अलगद उघडावे… 
आणि…. 
राधा समोर तू दिसावीस… 
You know what Radha 
I…. 
-निकिता आवारे

Sunday, June 9, 2013

पाऊस - एक अतृप्त मैफिल

पावसामुळे चराचर सृष्टी मोहरून उठते, चैतन्य येतं हे जरी खरं असलं तरी एखाद्याचा जर आधीच उदास स्वर लागला असेल तर तो उदास प्राणी अजून उदास होऊन जाऊ शकतो आणि सगळं मिळूनही रिक्तपणाच उरतो फक्त !!


काय मस्त हवा सुटलीय
शरीराशी झोंबून मनाला आल्हाद देऊ पाहतेय
पावसाचे तुषार अंगाखांद्यावर नाचतायत
मी मात्र नुसता उदास उभा आहे फक्त

भोवताली अंधार दूरवर एक लुकलुकता दिवा
कानात गुंजती सूर कोणीतरी वाजवी पावा
ध्वनी-प्रकाशाचा विजोड तरी एक खेळ नवा
त्याचा एक मूक प्रेक्षक मी खेळ बघतोय विरक्त

एकटेपणाच्या कोशात माझं छोटंसं घर
बाहेर पडणारी पावसाची हळुवार सर
तरीही का लागावा आज हा दुःखी स्वर
या जगात राहूनही मी जगापासून अलिप्त

मल्हाराची मुसळधार आळवणी तर सारखीच चालू असते
मध्येच अचानक ताशासारखी आकाशात वीज कडाडते
पागोळ्यांची सुरावट तर सतत लेहरा धरतच असते
या श्रवणीय श्रावणमैफिलीतून मी मात्र मुक्त

नांदीपासून भैरवीपर्यंत ही मैफिल रंगते
उत्कटतेच्या समेवर येऊन पावसाची जुगलबंदी संपते
माझी मात्र अखेरच्याही तिहाईची टाळी चुकते
सारे काही अनुभवूनही मी मात्र अतृप्त

Friday, May 10, 2013


कविता कधी, कुठे, कशी सुचेल ह्याचा काही नेम नाही. गदिमांना ती कधी हॉटेलमध्ये बसलेले असताना (दर्यावरी नाच करी, होडी चाले कशी भिरीभिरी) सुचते आणि ते बसच्या तिकिटावर लिहितात तर सुरेश भटांना टॅक्सीत सुचतं (सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे, अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे) आणि ते मिळेल त्या कागदावर लिहितात. मी गदिमा किंवा सुरेश भट नाही तरी पण शेवटी ही कविता मला सुचली अशाच एका Weird वेळी (रात्री झोपायची तयारी करत असताना) सुचली. खरं म्हणजे कवितेचा विषयही २३व्या वर्षी सुचावा असा नाही. पण काय आता,  सुचली !!  नशिबाने आजकाल मोबाईल हाताशी असल्यामुळे अगदी तिकिटावर किंवा मिळेल त्या कागदावर लिहिण्याची वेळ येत नाही इतकंच !!
कधी नव्हे ते यमक, वृत्त  इत्यादींचा वापर करावासा वाटला नाही.
'एक असा वयस्क माणूस ज्याची जीवनसाथी त्याला कायमची सोडून निघून गेली आहे अशा माणसाच्या भावना या कवितेत आहेत.'



रात्रीच्या मिट्ट काळोखात
चांदण्या चमचम करतायत
पण माझ्या आकाशातलं शीतल चांदणं
कायमचं हरवलंय

सतत वाटत राहतं
शुक्लातल्या प्रतिपदेसारखी
किंवा वद्यातल्या चतुर्दशीसारखी
छोटीशी का होईना पण निदान एक कोर दिसेल कुठेतरी
पण समजूनसुद्धा उमजत नाही
आयुष्यात माझ्या कायमची आमावस्या केव्हाच झालीय

उरल्यात त्या फक्त आठवणी
प्रतिपदा ते पौर्णिमेसारख्या
आपल्या कलाकलाने वाढलेल्या प्रेमाच्या
आता हा अंधार मात्र माझा कायमचा सोबती झालाय

रामप्रहरी आयुष्याच्या आपली पहिली भेट झाली
अष्टौप्रहर साथ दिलीस
उद्या दिनचक्राप्रमाणे दिवस सुरू होईल खरा
पण माझ्या रथाचं चाक मात्र तुझ्याच आठवणींत रुतलंय

याच आठवणींची मऊसूत शाल
ओढून बसतो एकटाच खाली
वर सोबतीला आभाळाच्या चादरीवर चांदण्यांनी नक्षी रेखलेली
पण तुझ्या प्रेमाची ऊब त्याला कधीच नाही हे कळून चुकलंय

बघत बसतो टक लावून शोधत त्या ताऱ्यांत तुला
कारण म्हणे सोडून गेलेल्या प्रियजनांचे तारे होतात
पण मनात ध्रुवताऱ्यासारखं अढळपद मिळवून
मला हवाहवासा तारा मात्र केव्हाच निखळलाय

शोधतोय वाट याच तारांगणातून स्वर्गाकडे नेणारी
येशील तू बाहू पसरून मला जिथे सामोरी
मिठीत त्या सामावले असेल सारे विश्व सारे आकाश
दिपेल चराचर सृष्टी पाहून प्रीतीचा सूर्यप्रकाश

Tuesday, April 30, 2013

मैत्री म्हणजे काय




मैत्री म्हणजे काय

एकाची साद सगळ्यांचा प्रतिसाद

कट्टयाच्या साक्षीने कटिंगचा आस्वाद



मैत्री म्हणजे काय

शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर गप्पांची मैफिल

वेळेचं भान नाही सारेच गाफील



मैत्री म्हणजे काय

मोठ्या मोठ्या प्लॅन्सच्या बड्या बड्या बाता

वडापाव फ्रँकीनंतर आईस्क्रीम खाता खाता



मैत्री म्हणजे काय

पास व्हा किंवा नापास व्हा सगळ्यांना हवी पार्टी

एक नंबरची नालायक आहेत सगळी कार्टी



मैत्री म्हणजे काय

नोट्सच्या झेरॊक्स आणि असाइनमेण्ट्स कॊपी

अभ्यासाची ही पद्धत आहे खूप सोपी



मैत्री म्हणजे काय

कॊलेजला दांडी किंवा  लेक्चर बंकिंग

नाक्यावर उभं राहून रोजचं 'साइटसीइंग

'

मैत्री म्हणजे काय

गुपचूप बघितलेला दुपारचा पिक्चर

घरी कळल्यावर  मिळालेलं लेक्चर



मैत्री म्हणजे काय

एकमेकांना जोडणारा विश्वासाचा सांधा

दुःखामध्ये रडायला हक्काचा खांदा



मैत्री म्हणजे काय

फेसबुकने जोडलेली मैत्रीची गॅप

इन्स्टंट गप्पांसाठी मोबाईलवर व्हॊट्स्-ऄप



मैत्री म्हणजे काय

अध्यात्मिक ते रोमँटिक सगळ्या विषयांवर गप्पा

प्रत्येकासाठी जपलेला मनातला एक-एक कप्पा



मैत्री म्हणजे असतं अजूनही बरंच काही

लिहित बसलो सगळं तर जागा पुरणार नाही



एवढं सगळं असताना आणखी वेगळं काय हवं

आयुष्याच्या क्षितिजावरती रोज दोस्तीचं रूप नवं

Monday, April 29, 2013

सागराच्या लाटा



ही मी केलेली एक कविता : दिनांक २२ ऑगस्ट २००४ रोजी केलेली. दिल्ली बालभवनच्या 'बालश्री ' पुरस्काराच्या Zonal Round साठी मुंबईतून (Local Round मधून)माझी निवड झाली होती होती. त्याची तयारी माझ्याकडून मुंबईच्या जवाहर बालभवनच्या थरवळ बाई करून घेत होत्या. सरावासाठी त्यांनी मला 'सागराच्या लाटा' हा विषय दिला. तेव्हा केलेली ही कविता. यानंतरही मी अनेक कविता केल्या. ज्यांनी ऐकल्या त्यांना त्या आवडल्याही. पण माझ्या दृष्टीने ही कविता मी आतापर्यंत केलेल्या कवितांपैकी सर्वोत्कृष्ट कविता आहे. 'बालश्री' साठी अत्यावश्यक अशी Creativity या कवितेत मला दिसते. समुद्राच्या लाटांकडे या कवितेत मी एका वेगळ्याच नजरेने बघितलंय असं मला वाटतं.


खडकावर एका बसलो होतो शून्यात नजर लावली होती
समोर पसरलेल्या अथांग सागरावर दृष्टी माझी खिळली होती

उसळत होत्या लाटा अन् फुटत होत्या त्यांना वाटा
जिकडेतिकडे पसरल्या होत्या सूर्यास्तावेळच्या तांबूस छटा
हे सगळं बघताना मनात विचारांची वादळं उठली होती
समोर पसरलेल्या अथांग सागरावर दृष्टी माझी खिळली होती

उसळताना या लाटांना सांगा काय वाटत असेल ?
आधी उसळणं मग मिसळणं हेच का लाटांचं जीवन असेल ?
पण लाटांना मदत करणं काही नव्हतं माझ्या हाती
समोर पसरलेल्या अथांग सागरावर दृष्टी माझी खिळली होती

समुद्राच्या लाटांनीच साकारलं होतं सूर्यास्ताचं सुंदर शिल्प
त्याच्या सौंदर्याबद्दल माझ्या मनात नव्हता विकल्प
ते शिल्प म्हणजे जणू होता एक मौल्यवान मोती
समोर पसरलेल्या अथांग सागरावर दृष्टी माझी खिळली होती

सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे लाटा भूमातेचे धुतात चरण
मग त्यांचं आयुष्य क्षणभंगूर असण्याचं काय कारण ?
अशाप्रकारे लाटांची कणव मला वाटत होती
समोर पसरलेल्या अथांग सागरावर दृष्टी माझी खिळली होती

अरे मनुष्या, गतिमान रहा लाटांप्रमाणे तर तू खरा मनुष्य
खात्री देतो तुला की पावन होईल आयुष्य
मनात उठणारी विचारांची वादळं आता शमू लागली होती
तरीसुद्धा, समोर पसरलेल्या अथांग सागरावर दृष्टी माझी खिळली होती

खडकावरून उठलो तो लाटांपासून प्रेरणा घेऊनच
जीवनात काहीतरी करून दाखवण्याचं माझ्या मनी ठरवूनच
मला पाठिंबा दर्शवण्यासाठीच जणू तेवढ्यात मोठी लाट उसळली
पुन्हा एकदा, समोर पसरलेल्या अथांग सागरावर दृष्टी माझी खिळली