Labels

Friday, May 10, 2013


कविता कधी, कुठे, कशी सुचेल ह्याचा काही नेम नाही. गदिमांना ती कधी हॉटेलमध्ये बसलेले असताना (दर्यावरी नाच करी, होडी चाले कशी भिरीभिरी) सुचते आणि ते बसच्या तिकिटावर लिहितात तर सुरेश भटांना टॅक्सीत सुचतं (सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे, अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे) आणि ते मिळेल त्या कागदावर लिहितात. मी गदिमा किंवा सुरेश भट नाही तरी पण शेवटी ही कविता मला सुचली अशाच एका Weird वेळी (रात्री झोपायची तयारी करत असताना) सुचली. खरं म्हणजे कवितेचा विषयही २३व्या वर्षी सुचावा असा नाही. पण काय आता,  सुचली !!  नशिबाने आजकाल मोबाईल हाताशी असल्यामुळे अगदी तिकिटावर किंवा मिळेल त्या कागदावर लिहिण्याची वेळ येत नाही इतकंच !!
कधी नव्हे ते यमक, वृत्त  इत्यादींचा वापर करावासा वाटला नाही.
'एक असा वयस्क माणूस ज्याची जीवनसाथी त्याला कायमची सोडून निघून गेली आहे अशा माणसाच्या भावना या कवितेत आहेत.'



रात्रीच्या मिट्ट काळोखात
चांदण्या चमचम करतायत
पण माझ्या आकाशातलं शीतल चांदणं
कायमचं हरवलंय

सतत वाटत राहतं
शुक्लातल्या प्रतिपदेसारखी
किंवा वद्यातल्या चतुर्दशीसारखी
छोटीशी का होईना पण निदान एक कोर दिसेल कुठेतरी
पण समजूनसुद्धा उमजत नाही
आयुष्यात माझ्या कायमची आमावस्या केव्हाच झालीय

उरल्यात त्या फक्त आठवणी
प्रतिपदा ते पौर्णिमेसारख्या
आपल्या कलाकलाने वाढलेल्या प्रेमाच्या
आता हा अंधार मात्र माझा कायमचा सोबती झालाय

रामप्रहरी आयुष्याच्या आपली पहिली भेट झाली
अष्टौप्रहर साथ दिलीस
उद्या दिनचक्राप्रमाणे दिवस सुरू होईल खरा
पण माझ्या रथाचं चाक मात्र तुझ्याच आठवणींत रुतलंय

याच आठवणींची मऊसूत शाल
ओढून बसतो एकटाच खाली
वर सोबतीला आभाळाच्या चादरीवर चांदण्यांनी नक्षी रेखलेली
पण तुझ्या प्रेमाची ऊब त्याला कधीच नाही हे कळून चुकलंय

बघत बसतो टक लावून शोधत त्या ताऱ्यांत तुला
कारण म्हणे सोडून गेलेल्या प्रियजनांचे तारे होतात
पण मनात ध्रुवताऱ्यासारखं अढळपद मिळवून
मला हवाहवासा तारा मात्र केव्हाच निखळलाय

शोधतोय वाट याच तारांगणातून स्वर्गाकडे नेणारी
येशील तू बाहू पसरून मला जिथे सामोरी
मिठीत त्या सामावले असेल सारे विश्व सारे आकाश
दिपेल चराचर सृष्टी पाहून प्रीतीचा सूर्यप्रकाश

No comments:

Post a Comment