पावसामुळे चराचर सृष्टी मोहरून उठते, चैतन्य येतं हे जरी खरं असलं तरी एखाद्याचा जर आधीच उदास स्वर लागला असेल तर तो उदास प्राणी अजून उदास होऊन जाऊ शकतो आणि सगळं मिळूनही रिक्तपणाच उरतो फक्त !!
काय मस्त हवा सुटलीय
शरीराशी झोंबून मनाला आल्हाद देऊ पाहतेय
पावसाचे तुषार अंगाखांद्यावर नाचतायत
मी मात्र नुसता उदास उभा आहे फक्त
भोवताली अंधार दूरवर एक लुकलुकता दिवा
कानात गुंजती सूर कोणीतरी वाजवी पावा
ध्वनी-प्रकाशाचा विजोड तरी एक खेळ नवा
त्याचा एक मूक प्रेक्षक मी खेळ बघतोय विरक्त
एकटेपणाच्या कोशात माझं छोटंसं घर
बाहेर पडणारी पावसाची हळुवार सर
तरीही का लागावा आज हा दुःखी स्वर
या जगात राहूनही मी जगापासून अलिप्त
मल्हाराची मुसळधार आळवणी तर सारखीच चालू असते
मध्येच अचानक ताशासारखी आकाशात वीज कडाडते
पागोळ्यांची सुरावट तर सतत लेहरा धरतच असते
या श्रवणीय श्रावणमैफिलीतून मी मात्र मुक्त
नांदीपासून भैरवीपर्यंत ही मैफिल रंगते
उत्कटतेच्या समेवर येऊन पावसाची जुगलबंदी संपते
माझी मात्र अखेरच्याही तिहाईची टाळी चुकते
सारे काही अनुभवूनही मी मात्र अतृप्त
No comments:
Post a Comment