Labels

Sunday, May 3, 2020

जागतिक हास्य दिन

खरं तर त्या दोघांनाही प्रत्यक्षात पाहिलेलं नाही. जगाला हसवण्याचं जीवित कर्तव्य विधात्याने नेमून दिल्यासारखा एक जण ते कार्य पूर्ण करून माझ्या जन्माआधी १३ वर्ष मृत्यू पावला होता. दुसरा होता तो पहिल्याला आदर्श मानायचा. दुसरा गेला त्या वेळी मी नऊ-दहा वर्षांचा होतो. पण ना कधी त्याला पहायचं भाग्य लाभलं, ना तो असेपर्यंत त्याची महती कळली. तसाही माझ्या जन्माआधी अनेक वर्ष तो फार काही त्याच्या क्षेत्रात कार्यरत नव्हता. पण असं असूनही नवरसांपैकी असलेल्या हास्य रसाची माझ्या आयुष्यात निष्पत्ती करण्यात या दोघांचा सिंहाचा वाटा होता. या दोघांव्यतिरिक्त माझ्या आयुष्यात हास्य रस आणणारी एकमेव व्यक्ती म्हणजे माझे बाबा. या रसाचं महत्त्व बाबांना कळत असणार. कारण त्या दोघांनाही माझ्या आयुष्यात आणलं ते माझ्या बाबांनीच. यातली पहिली व्यक्ती म्हणजे हसता हसता भावनिक करणाऱ्या मिशीधारी गबाळ्या सामान्य माणसाला पडद्यावर अजरामर करणारा चार्ली चॅप्लिन आणि दुसरे म्हणजे सामान्य मध्यमवर्गीय मराठी माणसाचं जगणं आपल्या लेखन आणि अभिवाचनाच्या सहज आणि विनोदी शैलीतून प्रेक्षकांसमोर आणणारे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थात 'पुल' !
दोघांनीही सामान्य माणसालाच रसिकांसमोर उभं करून सामान्य माणसांना हसवलं. आपल्यासमोर कुणी धाऽडकन पडलं तर आपण हसतो. चार्लीचा 'द ट्रँप' असा कुठे पडला की आपण असेच हसतो. चार लोक त्याच्या भोळेपणाचा फायदा घेतात, त्याला मार खावा लागतो, तो अडचणींत सापडतो हेही सगळं विनोदी. आपण सगळ्याला हसतो. आपल्याला मनाच्या एका कोपऱ्यात मात्र कुठेतरी त्याच्याबद्दल करुणा वाटत असते. मग पडलेला तो उठतो, त्याच्या वकुबाप्रमाणे लढतो, लढता लढता पुन्हा हसवू लागतो आणि अखेरीस जिंकतो. सामान्य माणसाचं असं असामान्य रीतीने लढून अखेरीस जिंकणं प्रेक्षकांना पडद्यावर आवडतं हा जागतिक इतिहास आहे. प्रेक्षकांना प्रत्यक्ष आयुष्यात शक्य नसलेलं पडद्यावर साकार होताना पहायला आवडतं. त्यामुळे आपल्याला बुटक्या 'द ट्रँप' चं जिंकणं आवडतं, माजलेल्या खलनायकांना धूळ चारणारा काटकुळा बच्चन आवडतो आणि बोमन इराणीच्या रईस खुराणाला मात देणारा अनुपम खेरचा दिल्लीकर निवृत्त म्हातारा कमल किशोर खोसलाही आवडतो.
चार्लीच्या ट्रॅम्पप्रमाणेच पुलंची असामी धोंडो भिकाजी जोशी (किंवा for that matter त्यांच्या विनोदी लेखनातून येणारे अनेक निनावी प्रथमपुरुष एकवचनी). हे धोंडो भिकाजी जोशी ट्रॅम्पसारखे गरीब वर्गातले नसून मध्यमवर्गीय असले तरी त्यांना त्यांच्या पातळीवरचा संघर्ष चुकलेला नाही. पाऊस आला की 'छत्री दुरुस्तीला टाकली पाहिजे' हे त्यांना आठवतं. स्टोव्हची पिन, दूधवाले, पेपरवाले, दाणेवाले, शेजारी, ऑफिसातले सहकारी अशा षड्रिपूंशी (आणि आणखीही काही रिपूंशी) त्यांना सामना करावा लागतो. बायकोबरोबर संसाराचा अगदी पिट्ट्या पडतो, ओला शर्ट घालून उभं रहावं लागतं, नाटक सोडून मुलांच्या चड्ड्यांच्या नाड्या सोडवाव्या लागतात आणि हट्ट पुरवावे लागतात. भर उन्हात सहकुटुंब बायकोच्या मावशीचा पत्ता शोधावा लागतो आणि एवढं करूनही आपण बैलोबा आहोत असं मावशीचं मत कळतं. ऑफिसातल्या सहकाऱ्याच्या आग्रहाला बळी पडून कोण्या हाय प्रोफाइल भोंदू बाबाला भेटावं लागतं, मुलाकडून आधुनिकतेचे धडे घ्यावे लागतात.... एक ना दोन. 'असा मी असामी'च्या जगाबाहेर पडून हसवणुकीच्या जगात शिरलं की विनोदी लेखकाची दुःख विनोदी शैलीत कळतात, बिगरी ते मॅट्रिकचा दुर्दैवी प्रवास बघावा लागतो, शत्रुपक्षाला आणि पाळीव प्राण्यांना तोंड द्यावं लागतं. अशा नकोशा माणसांची आयुष्यात 'खोगीरभरती' झाल्यामुळे करावी लागणारी 'नस्ती उठाठेव' आपल्या 'अघळपघळ' शैलीत मांडताना स्वतःचीच 'खिल्ली' उडवणारा हा सामान्य 'असामी' आपल्या 'पुरचुंडी'तलं अगदी 'उरलंसुरलं' देऊनही आपली 'हसवणूक' मात्र करतच राहतो.

आता माझे बाबा... चार्ली चॅप्लिनला CD आणि पुलंना पुस्तकरूपाने माझ्या आयुष्यात आणणारे. त्यांचा स्वभाव तसा सौम्य, पण तरीही मिस्किल आणि हजरजबाबी. माझ्या चुका सांगतानाही अनेकदा विनोदी आणि शालजोडीतले हाणून सांगण्याचा. हे बोलणं नुसत्या ओरडण्यापेक्षाही कित्येक पटीने बोचणारं असं. बाबांच्या कित्येक साध्यासाध्या बोलण्यालाही मी अगदी गडाबडा लोळून हसलोय. याला कारण ते बोलण्याची त्यांची शैली, त्या शैलीतून ते चित्र उभी करण्याची त्यांची हातोटी. शेवटी पेशाने चित्रकारच नाही का ते. बाबांची हजरजबाबी वृत्ती, गमत्या स्वभाव आणि त्यांनी मला ओळख करून दिलेले चॅप्लिन आणि पुल ही माझ्या आयुष्यातली फार मोठी पुंजी आहे.

या तिघांपैकी एक जण मला पिता म्हणून लाभला. त्यामुळे मी त्यांना छान ओळखू शकलो. बाबांच्या आणि माझ्या बऱ्याच आवडीनिवडी अनुवांशिकतेने जुळल्या आणि मैत्रीही झाली. चॅप्लिन आणि पुल यांना मी त्यांच्या कामातूनच ओळखू शकलो. लंडनच्या मादाम तुसॉमध्ये चार्लीच्या पुतळ्याबरोबर काढलेला फोटो आणि पुण्यात आयुष्यात दुसऱ्या कामासाठी का होईना पण एकदाच 'मालती-माधव'मध्ये ठेवलेलं पाऊल इतकाच काय तो मी पुलंच्या जवळ जाऊ शकलो. जगण्याचा संघर्ष केलेल्या ट्रॅम्प आणि धोंडो भिकाजी जोशी नामक असामींनी आमच्यासारख्यांना आमचा संघर्ष करताना चार विरंगुळ्याचे क्षण दिले. ते मात्र कायम सोबत राहतील.
कौस्तुभ दीक्षित
३ मे २०२०
लंडन

Saturday, April 4, 2020

एक शनिवार सकाळ

गेले काही महिने अगदी ० पासून फार फार तर ७-८ अंश असणारं तापमान चक्क १२ अंश सेल्सिअसच्या पातळीवर पोचलंय. गेल्या काही महिन्यांच्या ढगाळ, बोचरा थंडीवारा याच्या अगदी उलट असं जवळपास निरभ्र आकाश आहे, सुखद गारवा आणि स्वच्छ सूर्यप्रकाश दिसू लागला आहे. घरामागच्या झाडातून डोकावू लागलेली पालवी हेमंत आणि शिशिर मागे सारून वसंताचं स्वागत करत आहे. फ्रेंच विंडो कम स्लायडिंग डोअरमधून घरामागच्या हिरवळभरल्या गार्डनमधलं हे दृश्य दिसत असतं... हे गार्डन म्हणजे अशी हक्काची जागा की जिथून कुणीही 'उठ' म्हणणार नाही. आपण लगोलग एक खुर्ची टाकतो, हातात गरमागरम कॉफीचा मग घेतो आणि उन्ह अंगावर घेत कॉफीचा पहिला घोट घेतो. तो गरम घोट संपूर्ण चैतन्य आणि उत्साह आणतो. रोजच्या घाईघाईत कॉफी घेण्याच्या अगदी उलट... एक एक घोट जाणवत आपण कॉफी पिऊ लागतो. आजूबाजूला कोणी नाही. शांतता भंग करायला आहेत फक्त आसपास येणारे पक्ष्यांचे आवाज, इथे आपल्याव्यतिरिक्त माणूस नामक प्राण्याचा हस्तक्षेप नाही. मधूनच एखादं फुलपाखरू समोरच्या गवतावरून तरंगत जातं, तेवढ्यात बाजूच्यांच्या गार्डनमधून नाश्ता शोधत एक खारुताई चक्कर टाकायला येते, आणि आपल्या गार्डनमध्ये थोडावेळ फ्री शॉपिंग करून पुढच्यांच्या गार्डनमध्ये पळते. निवांत १५ एक मिनिटं घेत आपली कॉफी घोटाघोटाने संपते. त्या १५ मिनिटांत दिसलेला हा मिनी निसर्ग शनिवार सकाळ प्रसन्न करून जातो. -कौस्तुभ ४-४-२०२० लंडन

Thursday, January 30, 2020

लहरों पे अपना एक घर हो

आज वसंतपंचमी, विद्यादेवी सरस्वतीचा आज जन्मदिवस. आणि त्या साक्षात वाग्देवीने निवास केलेलं भूलोकीचं नंदनवन म्हणजे 'काश्मीर' ! "नमस्ते शारदे देवी काश्मीरपुर वासिनी" असा उल्लेख आपल्याला माहीत आहे.

भौगोलिक सौंदर्याने नटलेलं काश्मीर, सफरचंदासारख्या लाल गोऱ्या सौंदर्याचं काश्मीर, मध्यमवर्गीय परदेशी स्वप्नांचं स्वदेशी हनिमूनरूप , 'पंछी, नदियाँ, पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हें रोके' म्हणत वाहणाऱ्या सिंधू नदीचं काश्मीर, शारदापीठाचं काश्मीर आणि गेली अनेक वर्ष अमोज प्राणाहुती ज्यात पडल्या असं धगधगतं अग्निकुंड बनलेलं काश्मीर..… काश्मीर नामक शापित सौंदर्याची ही वेगवेगळी रूपं. भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे 'कश्मीर की कली' वगैरे उल्लेख सिनेमांमधून येतोच. येत्या फेब्रुवारीत काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर 'शिकारा' हा चित्रपट येतोय. दिग्दर्शक आहे विधु विनोद चोप्रा. विधु विनोद चोप्रा म्हटलं की त्याने निर्माण केलेल्या मुन्नाभाई, परिणिता, PK, 3 Idiots, वझीर, संजू वगैरे चित्रपट आपल्याला आठवतात. पण त्याचं नाव ऐकलं की मी थेट जवळपास १९ वर्ष मागे जातो. इयत्ता पाचवीतला मी, हृतिक रोशन नामक शेवटचा सुपरस्टार नुकताच उदयाला आलेला, तमाम तत्कालीन मुलांप्रमाणे मीही त्याचा 'कहो ना प्यार है' बघून कैच्या कै फॅन झालेला. 'फिज़ा' वेगळा पण संवेदनशील विषय. त्यावेळी फार कळला नव्हता. अशात तिसरा 'मिशन कश्मीर' ऑक्टोबरमध्ये आला. तब्बल अडतीस आठवडे म्हणजे नऊ महिने झालेले पण मी अजून बघितला नव्हता. "बाबा थिएटर्स कमी होतायत, मला घेऊन चला ना" चा धोशा एक दिवस बाबांनी मनावर घेतला आणि मला घेऊन माटुंग्याहून ट्रेनबिनने ग्रँट रोडच्या नॉव्हेल्टी थिएटरात मला घेऊन गेले. आणि अखेर तो सिनेमा बघितला आणि माझं घोडं सिंधूत न्हालं ! इरशाद कामिल आणि समीर यांचे सुंदर शब्द आणि शंकर-एहसान-लॉयचं श्रवणीय संगीत ही या चित्रपटाची उजवी बाजू.

बुमरो, रिंद पोशिमार ही फार गाजली पण त्यांच्याइतकंच माझं आणखी एक आवडतं आणखी एक गाणं होतं. 'सोचो के झीलों का शहर हो' म्हणत आपल्या घराचं स्वप्नरंजन करणारे, काश्मिरी वेशात अत्यंत गोड दिसलेले हृतिक रोशन आणि प्रीती झिंटा, त्यांचा तो नेत्रसुखद घेतलेला असा तो ड्रीम सिक्वेन्स.... बघणारा थेट खल्लास रे !!! उदित आणि अलका आपल्या आवाजाने आपल्याला या गाण्यात वेगळ्याच दुनियेत नेऊन ठेवतात. समीर यांनी काय सुंदर शब्द लिहिले आहेत गाण्याचे...

'सोचो के झीलों का शहर हो
लहरों पे अपना एक घर हो
हम जो देखें, सपने प्यारे, सच हों सारे
बस और क्या...'

अहाहा... दोघांच्या स्वप्नातल्या घरट्याचं वर्णन किती समर्पक शब्दांत केलं आहे !!

'फ़र्श हो प्यार का खुश्बूओं की दीवारें
हम जहां बैठके प्रेम से दिन गुज़ारें
पलकें उठें पलकें झुकें
देखे तुझे बस ये नज़र'

प्रेमाचा पाया असलेल्या अशा घरात आपल्या सखीसोबत एकमेकांकडे बघत निवांत दिवस व्यतीत करण्याची ही कविकल्पना मनाला गुदगुल्या करून जाणारी...

'बर्फ़ ही बर्फ़ हो सर्दियों का हो मौसम
आग के सामने हाथ सेंकते हों हम
बैठी रहूं आग़ोश में रखके तेरे कांधे पे सर'

तिला उंची भेटी नकोत, भटकणं नको, हॉटेलिंग नको..... काय हवं तर त्याच्या खांद्यावर शांतपणे डोकं ठेवायला मिळावं... 'तेरे कांधेपर रखकर सर, यूँही कट जाए सारी उमर' मधली भावना. इतका ठहराव, शांतता, शब्द, चाल, संगीत आणि स्वर यांतून व्यक्त होते.
ऑफिस, काम, यांच्या त्रासातून सुटका करून घेताना आपल्याला रोज कधी एकदा घरी येतो आणि निवांत होतो असं होत असतं. घर आणि आपली प्रेमाची माणसं हा एक विसावा असतो. त्यामुळे असा 'ठहराव' देणारं आपलं स्वतःचं एक हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. वाढत चाललेल्या घराच्या किमती आणि त्याच्याशी क्षीण स्पर्धा करू पाहणारं उत्पन्न यांचा मेळ जमून होमलोन वगैरे चक्रातून कधी तरी घर घेणं शक्य व्हावं असं आपलं एक स्वप्न असतं. हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय असतो. इथे काश्मीरची पार्श्वभूमी असल्यामुळे ते 'झीलों का शहर' आहे, आपल्या नोकरीधंदा-प्रवास वगैरे ऐवजी लष्करी तणाव, आपलं माणूस जिवंत दिसेल की नाही ही टेन्शन्स् आहेत. त्यामुळे गाण्याच्या शेवटी तो ड्रीम सीक्वेन्स संपून वास्तवात येताना हृतिक-प्रीतीचे भकास चेहरे समोर येतात आणि विरून जाणारे शब्द कानांवर येतात...

'छोटासा झीलों का शहर था
उसमें हमारा एक घर था...
हम थे तुम थे, ना ये ग़म थे
क्या था क्या से क्या हो गया...'

स्वप्न-अपेक्षा त्याच आहेत... आपलं घर, आपली माणसं आणि तोच, 'ठहराव'... प्रत्येकाला हे स्वतःचं छोटंसं सुरक्षित घरटं लाभू दे... आणखी काय अपेक्षा...

-कौस्तुभ दीक्षित

३० जानेवारी २०२०

लंडन

Friday, January 10, 2020

एक चेहरा ख़ास है, जो दिल के पास है


हाफचड्डीत होतो रे जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं. मला आठवतंय 'कहो ना प्यार है'ची रिलीजच्या आधीच भरपूर हवा झालेली. तुला पहायला दादरच्या प्लाझा थिएटरात शिरलो आणि तुझ्या मॅनिया ने झपाटून टाकलंय आजतागायत !! त्या 'कहो ना प्यार है' बघणाऱ्या तत्कालीन दादरवासी चौथीतल्या मुलाचा आज Ilfordच्या Cineworld थिएटरमध्ये 'War' बघणारा एकोणतीस वर्षांचा विवाहित माणूस झालाय एवढाच काय तो फरक... पण तू तसाच आहेस... तेव्हाही '❤️' आणि आजही '❤️'च.

आजपर्यंत तू केलेले काही उत्तमोत्तम चित्रपट असोत किंवा दणकून आपटलेले तेही असोत.... तुला रक्ताने पत्र लिहिणाऱ्या मुलींचे किस्से पाहिले आणि तुझ्या चारित्र्यावर झालेले आरोपही पाहिले... त्या आरोपांमधलं खरंखोटं मी केलं नाही, कारण ते करावं वाटलं नाही. बघताक्षणी मुलांनाही '❤️'  व्हावं असे तुझे बायसेप्स आणि ते राजबिंडं देखणेपण पाहिलं, त्याचबरोबर आत्ताआत्ता Youtube तुझ्या गोलगरगरीत शरीराच्या पुनश्च ग्रीक देवरूप मेहनतीने परत मिळवलेल्या परिवर्तनाचा व्हिडिओही पाहिला (मराठीत 'फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन'). तेव्हा तुला गर्लफ्रेंड असल्याचं कळल्यानंतर उसासे टाकणाऱ्या पोरींबद्दल ऐकलं/वाचलंय आणि आज घटस्फोटानंतरही दोन मुलांच्या कुटुंबवत्सल बापाच्या ट्रिप्स वगैरेंच्या पोस्ट्स आज पाहतोय.... तुला टेकऑफ देणाऱ्या आणि कठीण परिस्थितीत/आजारपणात तुझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या बापाच्या आजच्या आजारपणात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या तुझ्यातल्या पितृभक्त पुत्रालाही पाहतोय....

२० वर्ष झाली तुझा फॅन आहे रे मी.... आणि ते भारावलेपण उतरेल अशी शक्यताही वाटत नाही. ZNMD नंतर कुठेतरी हरवलेल्या तुला Super 30 आणि War ने पुन्हा दिलेली उभारी बघताना आज जीव सुखावतोय. तू असाच मला भारावत रहा.... बेस्ट आहेसच रे तू. मोठ्या पडद्यावर 'जादू' दाखवत रहा म्हणजे झालं.

हृतिक रूप चित्ती राहो
मुखी हृतिक नाम...
किंवा
एक चेहरा ख़ास है,
जो दिल के पास है ❤️

Happy Birthday Hrithik !!!
#HBDHrithik
#CinemaGully

- Kaustubh

ऊन हिवाळा


काचेवरती कुणी पाडला असा उन्हाचा सडा
हिवाळ्यातल्या सौम्य दुपारी भरे सुखाचा घडा

सासुरवाशी सकाळ, कामे उरकुन मग बाहेरी जाते
हिवाळ्यातल्या स्निग्ध दुपारी ऊन घरी माहेरी येते

फरशीवरुनी रांगत येते भिंतीवरती रेलत जाते
हिवाळ्यातल्या संथ दुपारी ऊन असे सैलावत जाते

पहिल्या वाफेच्या भाताने सुस्तावुन झोपेला येते
हिवाळ्यातल्या सुस्त दुपारी ऊन वामकुक्षीला जाते

जडावली ती मग वेळेचा हिशोब नकळत सोडून देते
हिवाळ्यातली दुपार अलगद संधिप्रकाशी विरून जाते

Photo & Poetry
कौस्तुभ दीक्षित
१४-१२-२०१९