गेले काही महिने अगदी ० पासून फार फार तर ७-८ अंश असणारं तापमान चक्क १२ अंश सेल्सिअसच्या पातळीवर पोचलंय. गेल्या काही महिन्यांच्या ढगाळ, बोचरा थंडीवारा याच्या अगदी उलट असं जवळपास निरभ्र आकाश आहे, सुखद गारवा आणि स्वच्छ सूर्यप्रकाश दिसू लागला आहे. घरामागच्या झाडातून डोकावू लागलेली पालवी हेमंत आणि शिशिर मागे सारून वसंताचं स्वागत करत आहे. फ्रेंच विंडो कम स्लायडिंग डोअरमधून घरामागच्या हिरवळभरल्या गार्डनमधलं हे दृश्य दिसत असतं... हे गार्डन म्हणजे अशी हक्काची जागा की जिथून कुणीही 'उठ' म्हणणार नाही. आपण लगोलग एक खुर्ची टाकतो, हातात गरमागरम कॉफीचा मग घेतो आणि उन्ह अंगावर घेत कॉफीचा पहिला घोट घेतो. तो गरम घोट संपूर्ण चैतन्य आणि उत्साह आणतो. रोजच्या घाईघाईत कॉफी घेण्याच्या अगदी उलट... एक एक घोट जाणवत आपण कॉफी पिऊ लागतो. आजूबाजूला कोणी नाही. शांतता भंग करायला आहेत फक्त आसपास येणारे पक्ष्यांचे आवाज, इथे आपल्याव्यतिरिक्त माणूस नामक प्राण्याचा हस्तक्षेप नाही. मधूनच एखादं फुलपाखरू समोरच्या गवतावरून तरंगत जातं, तेवढ्यात बाजूच्यांच्या गार्डनमधून नाश्ता शोधत एक खारुताई चक्कर टाकायला येते, आणि आपल्या गार्डनमध्ये थोडावेळ फ्री शॉपिंग करून पुढच्यांच्या गार्डनमध्ये पळते.
निवांत १५ एक मिनिटं घेत आपली कॉफी घोटाघोटाने संपते. त्या १५ मिनिटांत दिसलेला हा मिनी निसर्ग शनिवार सकाळ प्रसन्न करून जातो.
-कौस्तुभ
४-४-२०२०
लंडन
No comments:
Post a Comment