Labels

Monday, April 29, 2013

सागराच्या लाटा



ही मी केलेली एक कविता : दिनांक २२ ऑगस्ट २००४ रोजी केलेली. दिल्ली बालभवनच्या 'बालश्री ' पुरस्काराच्या Zonal Round साठी मुंबईतून (Local Round मधून)माझी निवड झाली होती होती. त्याची तयारी माझ्याकडून मुंबईच्या जवाहर बालभवनच्या थरवळ बाई करून घेत होत्या. सरावासाठी त्यांनी मला 'सागराच्या लाटा' हा विषय दिला. तेव्हा केलेली ही कविता. यानंतरही मी अनेक कविता केल्या. ज्यांनी ऐकल्या त्यांना त्या आवडल्याही. पण माझ्या दृष्टीने ही कविता मी आतापर्यंत केलेल्या कवितांपैकी सर्वोत्कृष्ट कविता आहे. 'बालश्री' साठी अत्यावश्यक अशी Creativity या कवितेत मला दिसते. समुद्राच्या लाटांकडे या कवितेत मी एका वेगळ्याच नजरेने बघितलंय असं मला वाटतं.


खडकावर एका बसलो होतो शून्यात नजर लावली होती
समोर पसरलेल्या अथांग सागरावर दृष्टी माझी खिळली होती

उसळत होत्या लाटा अन् फुटत होत्या त्यांना वाटा
जिकडेतिकडे पसरल्या होत्या सूर्यास्तावेळच्या तांबूस छटा
हे सगळं बघताना मनात विचारांची वादळं उठली होती
समोर पसरलेल्या अथांग सागरावर दृष्टी माझी खिळली होती

उसळताना या लाटांना सांगा काय वाटत असेल ?
आधी उसळणं मग मिसळणं हेच का लाटांचं जीवन असेल ?
पण लाटांना मदत करणं काही नव्हतं माझ्या हाती
समोर पसरलेल्या अथांग सागरावर दृष्टी माझी खिळली होती

समुद्राच्या लाटांनीच साकारलं होतं सूर्यास्ताचं सुंदर शिल्प
त्याच्या सौंदर्याबद्दल माझ्या मनात नव्हता विकल्प
ते शिल्प म्हणजे जणू होता एक मौल्यवान मोती
समोर पसरलेल्या अथांग सागरावर दृष्टी माझी खिळली होती

सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे लाटा भूमातेचे धुतात चरण
मग त्यांचं आयुष्य क्षणभंगूर असण्याचं काय कारण ?
अशाप्रकारे लाटांची कणव मला वाटत होती
समोर पसरलेल्या अथांग सागरावर दृष्टी माझी खिळली होती

अरे मनुष्या, गतिमान रहा लाटांप्रमाणे तर तू खरा मनुष्य
खात्री देतो तुला की पावन होईल आयुष्य
मनात उठणारी विचारांची वादळं आता शमू लागली होती
तरीसुद्धा, समोर पसरलेल्या अथांग सागरावर दृष्टी माझी खिळली होती

खडकावरून उठलो तो लाटांपासून प्रेरणा घेऊनच
जीवनात काहीतरी करून दाखवण्याचं माझ्या मनी ठरवूनच
मला पाठिंबा दर्शवण्यासाठीच जणू तेवढ्यात मोठी लाट उसळली
पुन्हा एकदा, समोर पसरलेल्या अथांग सागरावर दृष्टी माझी खिळली


No comments:

Post a Comment