Labels

Monday, April 29, 2013

विराट कोहली, क्रिकेट आणि खिलाडूवृत्ती-सभ्यपणा वगैरे…


नुकतंच IPL6 मधल्या Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore मॅचमध्ये प्रत्यक्ष क्रिकेटनंतर इतर बरंच काही झालं. RCBचा कर्णधार विराट कोहलीने Mumbai Indiansच्या अंबाती रायुडूला Runout करताना त्यावेळी अजाणतेपणी का होईना गोलंदाज R. विनय कुमारचा पाय रायुडूच्या बॅटला लागल्यामुळे रायुडू Runout झाला. त्यावेळी खिलाडूवृत्ती दाखवून कर्णधार कोहलीने स्वतः पुढाकार घेऊन रायुडूला परत बोलावणं हे मुंबईच्या पाठीराख्यांना अपेक्षित होतं. पण त्याने तसं केलं नाही. त्यामुळे कोहली बॅटिंगला आल्यावर आणि Post-Match Presentationच्या वेळी मुंबईकरांनी त्याची हुर्यो उडवली. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विराटने "ते बहुधा विसरलेत की मी भारतासाठीसुद्धा खेळतो" अशा आशयाचं विधान केलं. आणि याउपर आपल्या (रायुडूला परत न बोलावण्याच्या) निर्णयाचं समर्थन करताना "पंचांनी जर त्याला बाद ठरवलं होतं आणि त्यांना त्याला थांबवावसं वाटलं नाही तर मी का त्याला परत बोलवावं" असं बोलून हात वर केले.

यापैकी त्याचं पहिलं विधान म्हणजे 'लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण' यातला प्रकार झाला. हे विधान करताना अगदी काहीच दिवसांपूर्वी Kolkata Knight Riders विरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर प्रतिस्पर्धी कर्णधार गौतम गंभीरशी त्याने जी शाब्दिक चकमक केली होती ती बहुधा तो विसरला असावा. त्यावेळी गंभीरही भारतासाठीच खेळतो हे तो विसरला असावा. आता हे विसरणं genuine होतं की सोयीस्कर होतं हे तो स्वतःच जाणे. कारण आपली मतं आणि विचार सोयीस्कररीत्या विसरणं हे राजकारणात आपण बघतोच आजकाल. हाही तसाच प्रकार झाला.

त्याचं दुसरं विधान "पंचांनी जर त्याला बाद ठरवलं होतं आणि त्यांना त्याला थांबवावसं वाटलं नाही तर मी का त्याला परत बोलवावं" हे. यातल्या "का बोलवावं" याचं उत्तर म्हणजे खिलाडूवृत्ती ज्याच्याशी त्याचा सुतराम संबंध नाही. कारण मैदानावरची विराट कोहलीची प्रतिमा एक असभ्य खेळाडू अशीच आहे. त्यामुळे त्याने ती खिलाडूवृत्ती दाखवावी ही अपेक्षा बाळगणं म्हणजे राहुल द्रविड 'हेलिकॉप्टर शॉट' मारेल अशी अपेक्षा ठेवण्यासारखं आहे.

आता राहता राहिलं ते म्हणजे प्रेक्षकांनी अशी Extreme प्रतिक्रिया देऊन आपला निषेध व्यक्त करणं योग्य होतं का ? मुंबईकर प्रेक्षकांच्या  या वर्तनावर 'Shame on you Mumbai Crowd', 'You gotta feel bad for this guy (this guy म्हणजे कोहली)' , 'Even Sachin Tendulkar was booed here' अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. काहींनी तर मराठी-अमराठी वादाचा संबंधही याच्याशी जोडला. अर्थात शेवटी सगळा 'मुखमस्तीति वक्तव्यम्" हाच न्याय (हा Blog सुद्धा !!).  प्रेक्षकांची ही प्रतिक्रिया टोकाची आहे असं मानून सगळा दोष त्यांच्यावर ढकलला तरी त्यातून कोहलीच्या वागण्याचं कुठल्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही. वर्षभरापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रेक्षकांकडे बघून याच कोहलीने असभ्य इशारे  केले होते. त्यामुळे 'करावे तसे भरावे' ह्या न्यायाने आज he got the taste of his own medicine.

कोहलीने आपल्या प्रतिक्रियेत INDIA वगैरे शब्द वापरल्यामुळे अनेकांचा (एरवी कधीही जागृत न होणारा) देशाभिमान जागृत झाला आणि त्यांनी त्याच्या समर्थनार्थ बाह्या सरसावल्या. कारण आपल्याकडे देश, राष्ट्र असे शब्द कोणी वापरले की सगळ्यांना स्फुरण चढतं. आज त्याचं समर्थन करणारे हेच ५-६ वर्षांपूर्वी महेंद्रसिंग  ढोणीचा असाच उदोउदो करत होते. ढोणीलाही नंतरच्या अपयशांमुळे याच लोकांच्या रोषालाही सामोरे जावे लागलं. अर्थात या सगळ्यातून विराट कोहली काही बोध घेईल असं वाटत नाही.

भावी कर्णधार म्हणून आज कोहलीकडे पाहिलं जातं. त्याचं क्रिकेट कौशल्य अप्रतिम आहे हे सांगायला मी कोणी क्रिकेट तज्ज्ञ असायची गरज नाही. पण जर त्याला खरंच एक great leader व्हायचं असेल तर त्याने आपल्या स्वभावातला आक्रमकपणा माजी कर्णधार सौरव गांगुलीसारखा योग्य ठिकाणीच वापरावा. उगाच त्याचं उठसूट प्रदर्शन करत हिंडू नये. हे सगळं बघितलं की खरंच सचिन तेंडुलकर , राहुल द्रविड, महेंद्रसिंग ढोणी, अॅडम गिलख्रिस्ट यांच्या सभ्यपणाचं आणि शांतपणाचं कौतुक वाटतं. 'Cricket is a gentlemen's game' या वाक्याला जागणारे हे लोक. ही वृत्ती यांच्याबरोबरच लोप पावते की काय असं वाटण्यासारखी सध्या परिस्थिती आहे. कारण म्हातारी मेल्याचं दुःख आहेच पण काळ सोकावतोय याचं दुःख त्याहूनही जास्त आहे.

No comments:

Post a Comment