Labels

Monday, February 27, 2017

महेश काळे, पसायदान आणि ‘We are the world’ - ३

महेश काळे, पसायदान आणि ‘We are the world’
(भाग – ३ : ‘We are the world’)
‘We are the world’.... तसं बघायला गेलं तर फार छोटं वाक्य आहे, फक्त ४ शब्दांचं. पण हे चार शब्द जेव्हा एकापुढे एक येतात तेव्हा अतिशय वजनदार अर्थ पेलतात. माझ्यासाठी या वाक्याचा अर्थ काय ?
माझी परदेशात रहायची ही पहिलीच वेळ. आतापर्यंत घरात किंवा निदान भारतात तरी राहिलेला मी ६ महिन्यांपूर्वी काही काळासाठी पहिल्यांदा परदेशात आलो. ‘जा ओलांडुनिया सरिता सागरा’ म्हणत परदेशगमनाचं फार कौतुकही झालं. अनिवासी भारतीयांबद्दल असलेली, आतापर्यंत फक्त ऐकून असलेली तक्रार (पहिल्या भागाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे) अगदी परवापरवाच प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. ती म्हणजे ‘तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर आपल्या देशासाठी न करता स्वार्थासाठी आणि परदेशाच्या फायद्यासाठी करता’. या मुद्द्यावर खूप वादविवाद झाले (Paragने नामकरण केलेली १०८ Repliesची माळ). हा मुद्दा अगदीच खोटा आहे असं नाही, तथ्यही आहे. पण सरसकट तो आक्षेप लागू करणं हे मात्र गैरलागू आहे !
परदेशी जाणारे भारतीय नसते किंवा ते फक्त स्वार्थी विचार करत असते तर मुळात ‘कट्यार’ नव्याने आलं असतं का आणि आलं असतं तर इतकं घराघरात पोचलं असतं का, हा मुदलातला प्रश्न ! आता तसे Remittanceमुळे भारताच्या GDPला होणारा फायदा वगैरे आर्थिक फायदे जरी बाजूला ठेवले तरी परदेशी राहून आपल्या संस्कृतीची तळमळ नसती तर इकडे मराठी नाटकं, कार्यक्रम इतके Housefull नसते, महाराष्ट्र मंडळं आणि मित्रमंडळं नसती आणि ना कुठले सणवार असे हजारो मैल दूरवर अत्यंत उत्साहात साजरे झाले असते. पण असो. ‘जावे त्याच्या वंशा’.
तिकडे थोरमोठे ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणत किंवा पसायदान मागत किंवा ‘We are the world’ गात असताना आपण आपल्याच देशात राहून दुसऱ्यांवर टीका करत उंटावरून शेळ्या हाकतो म्हणून तर आपण सामान्य माणसं ! उलट बाहेर राहणाऱ्यांना मतदान करावंसं वाटलं तर त्यांनाच आपण ‘उंटावरून शेळ्या का हाकताय ?’ असं विचारतो !!
असो. कोणी काहीही म्हणो, आपण आपल्या देशावर आणि भाषेवर प्रेम करत रहायचं. कोणालातरी आपल्या प्रेमाची किंमत असते आणि म्हणूनच त्या मनापासून केलेल्या प्रेमाची पावती मिळावी तसा अचानक एखादा कार्यक्रम लागतो....
‘घेई छंद’
सहभाग : सुबोध भावे, राहुल देशपांडे आणि महेश काळे
दिनांक : ९ एप्रिल २०१७. दुपारी १ ते ६
स्थळ :
Logan Hall
20, Bedford Way,
LONDON
Saved the date already !!!!
(समाप्त)
-कौस्तुभ दीक्षित
२६-२-२०१७

No comments:

Post a Comment