या गाण्याची पार्श्वभूमी सांगताना MKने सांगितलं की, “हेही एक जगाचं पसायदानच आहे. वैश्विक पसायदान जर इंग्लिशमध्ये असेल तर हे असेल. ही एक वैश्विक प्रार्थना आहे”.
त्या कार्यक्रमात या गाण्याची झलक ऐकल्यानंतर डोक्यातल्या किड्यांनी अर्थातच वळवळ सुरू केली आणि हे गाणं लगेच YouTubeवर ऐकून, मग डाउनलोड करून ते Loopमध्ये ऐकून, समोर Lyrics उघडून असे उद्योग सुरू केले.
तर आपल्या मायमराठीतल्या ‘आता विश्वात्मके देवे’चीच संकल्पना या गाण्यात आहे. पण पॉइंट ऑफ व्ह्यू मात्र वेगळा आहे. आपण म्हणतो ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ कारण संतमंडळी सामान्य माणसाहून एका वेगळ्या पातळीवर विचार करतात. अशीच प्रार्थना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी नामक वाग्यज्ञाच्या शेवटी केली आहे. ते पसायदान म्हणजे त्यांनी या संपूर्ण विश्वाचा कर्ताधर्ताहर्ता असलेल्या वैश्विक देवाकडे मागणी केली आहे, म्हणून यातले पहिले शब्द येतात-
‘आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे’
ही मागणी तुमच्या माझ्या, म्हणजे मानवी पातळीवरची नाही, ती वैश्विक देवाकडची मागणी आहे. हा देव कुठल्या जातीधर्माचा नाही, म्हणून तो ‘विश्वात्मक’ आहे. पसायदानात पुढे ज्ञानेश्वर महाराज चराचरातील सर्व प्राणिमात्रांत शांतता नांदण्याची, कल्याणाची, सुखाची आणि मित्रत्वाची मागणी करतात.
‘We are the world’मध्ये गाभा तोच आहे, पण ही मागणी मानवी पातळीवरची आहे. याचे शब्द आहेत
‘There comes a time
When we head a certain call
When the world must come together as one
There are people dying
And it's time to lend a hand to life
The greatest gift of all’
हे मानवाला केलेलं आवाहन आहे. या जगात पीडित असे खूपजण आहेत, ज्यांच्यासाठी आयुष्य आपल्याइतकं सोपं नाही. जगताना त्यांना अनेकदा कठीण परिस्थितीतून जावं लागतं. अशांसाठी ही प्रार्थना की ‘आपण एकत्र येऊया’.
त्यामुळे
We can't go on pretending day by day
That someone, somewhere will soon make a change
We're all a part of God's great big family
And the truth, you know, love is all we need’ हे ‘जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥‘ यापेक्षा अजिबात वेगळं नाही.
त्याचप्रमाणे त्याच्यापुढचं
‘We are the world
We are the children
We are the ones who make a brighter day’
म्हणजेच ‘दुरितांचे तिमिर जावो
विश्व स्वधर्मसूर्ये पाहो’.
‘When you're down and out, there seems no hope at all
But if you just believe there's no way we can fall
Well, well, well, well let us realize oh! That a change can only come
When we stand together as one’ हे अगदी जसंच्या तसं नसलं तरी वाचताना कुठेतरी
‘चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥’ याच्याशी थोडंफार साधर्म्य सांगून जातं.
तर असं हे पसायदान... एक मराठीतलं एक इंग्रजीतलं... एकात विश्वदेवाला आवाहन तर दुसऱ्यात मानवाला... पण दोघांचा गर्भितार्थ एकच.... ‘मैत्र जीवाचे’ किंवा ‘love is all we need’.
या गाण्याचं आणि त्याच्या पसायदानाशी असलेल्या साधर्म्याचं इतकं महत्त्व माझ्यासाठी का ? हे लिहायला पुढचा आणि शेवटचा भाग !
(क्रमशः)
-कौस्तुभ दीक्षित
(२५-२-२०१७)
Monday, February 27, 2017
महेश काळे, पसायदान आणि ‘We are the world’ - २
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment