Labels

Monday, February 27, 2017

महेश काळे, पसायदान आणि ‘We are the world’ (भाग १ : महेश काळे)

काही दिवसांपूर्वीच एका ग्रुपवर एका विषयावर अनपेक्षितपणे चर्चा झाली की ‘NRI असलेल्यांसाठी मतदानाची काही विशेष सोय असावी का’ ? या विषयावर एका पोस्टवर एक वाद-चर्चा म्हणावी असं कॉमेंट्सचं एक मोठ्ठं session घडलं. होकारार्थी बाजूने Nikhil Joshi मी, Sanika Deshpande आणि इतर काहीजण बोलत होते, तर नकारार्थी बाजूने बोलणारे एकजण होते. त्यांचा आक्षेप मुख्यतः असा होता की परदेशात राहताय, आपली बुद्धिमत्ता परक्या देशासाठी वापरताय तर भारताकडून तुमच्या अपेक्षा का ? याला अर्थातच आम्ही कधी मुद्दे खोडून काढत, कधी जन्मजात अशा खवचटपणे (sarcastically) विरोध केला आणि Paragच्या भाषेत सांगायचं तर एका कमेन्टवर १०८ Repliesची ती जपमाळ ओढली गेली ! नंतर दोन तीन दिवस या चर्चेला कारण ठरलेली महाराष्ट्रातल्या महापालिका, नगरपरिषदा आणि पंचायत समित्या यांची निवडणूक पार पडली, त्याचे निकाल आले. दिवसभर फेसबुकवर त्या चर्चांचं गुऱ्हाळ वाचलं, थोडीफार आपल्या उसाची भर घातली आणि अखेर रात्री जरा निवांत झालो. आता काहीतरी छानशी गाणी ऐकूया म्हणून YouTubeवर आलो आणि सरळ ‘महेश काळे’ अशी Search String देऊन त्याला १ महिन्याचा filter लावला. गेल्या महिनाभरात upload झालेले videos समोर येऊ लागले. त्यात गजानन महाराजांच्या मंदिरातली मैफिल, झाकीरभाईंसोबतची मैफिल असे काही videos आले. ते बघत ऐकत असताना खाली suggestion मध्ये एक result दिसू लागला. तो होता ‘Mahesh Kale Newsroom’. ‘जय महाराष्ट्र’ या चॅनलवरची newsroom चर्चा होती. शास्त्रीय संगीत, ‘कट्यार’ आणि अभिषेकी बुवांचा शिष्य याचबरोबर यापलीकडचा म्हणजे अभियंता, अभिनेता, दोन्ही हातांनी चित्र काढणारा ‘Viru Sahasrabuddhe’ चित्रकार, पाश्चात्य संगीताचा जाणकार, परदेशात भारतीय संगीत फुलवणारा-शिकवणारा असा अष्टपैलू महेश काळे या पाऊण तासाच्या सुंदर मुलाखतवजा कार्यक्रमातून बघायला मिळाला.
गेली कित्येक वर्ष महेश काळे हे नाव ‘भारतीय संगीत’ क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि मंचावर गाजतं आहे. पण हा अतिशय गुणी गायक भारतातल्या अभिजन आणि नाट्यप्रेमी घरात पोचला तो पुनर्निर्मित ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातल्या ‘सदाशिव’ म्हणून आणि घराघरात पोचला तो त्याच ‘कट्यार’च्या चित्रपट माध्यमांतरातल्या सदाशिवचा आवाज म्हणून ! Sameer Samant लिखित ‘अरुणी किरणी’ या गाण्यासाठी त्याला मिळालेल्या ‘सर्वोत्कृष्ट गायक’ राष्ट्रीय पुरस्कारामुळे सर्वसामान्यांचं लक्ष वेधलं गेलं. माझ्या पिढीचा तर तो अगदी गळ्यातला ताईत झाला. मी स्वतःहून कुठल्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला जाईन असं ‘बापजन्मी’ मला वाटलं नव्हतं. पण ‘कट्यार’ आला आणि त्याने काळजाला हात घातला. हे फक्त माझ्याच नाही तर एकूणच तरुण पिढीच्या बाबतीत झालं. शास्त्रीय संगीत पुढच्या पिढ्यांकडे घाऊक प्रमाणावर नेण्याचं काम ‘कट्यार’ने केलं. मोबाइलवर ‘घेई छंद’, ‘सुरत पिया की’, ‘तेजोनिधी लोहगोल’ अशी गाणी नव्या रूपात वाजू लागली. त्याचबरोबर त्याच्या तोडीस तोड (माझ्या मते तरी) अशी ‘दिल की तपिश’, ‘मन मंदिरा’, ‘यार इलाही’, ‘शिव भोला भंडारी’, ‘यार इलाही’ अशी नवीन गाणीही वाजू लागली.
कौतुकाबरोबर टीकाही आलीच. दारव्हेकर मास्तर, अभिषेकी बुवा आणि वसंतराव देशपांडेंचं ‘कट्यार’ नाटक बघितलेल्या मागच्या पिढीतल्या अनेकांनी यथेच्छ टीकाही केली. गाण्यांची वाट लावली आहे, नाटकाचा गाभा चित्रपटात हरवला आहे, सदाशिवचा गाभा पूर्ण बदलून टाकला आहे, कविराजांच्या भूमिकेत फारच काटछाट केली आहे, नवीन लिहिलेली गाणी जुन्या गाण्यांची बरोबरी करू शकत नाही इथपासून महेश काळे मैफिलीत अॅक्टिंग (हातवारे आणि तोंडवारे) जास्त करतो, शंकरजी (शंकर महादेवन) शास्त्रीय गायकांच्या दर्जापर्यंत पोचू शकत नाहीत अशा एक ना दोन शंभर गोष्टी अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्यांपासून काही मोठ्या व्यक्तींपर्यंत अनेकांनी बोलून तोंडसुख घेतलं. पण आमच्या लाडक्या MKने मैफिलीतलं शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत मंचाच्या साच्यातून काढून प्रेक्षागृहापर्यंत नेलं. रसिक-कलाकार यांच्यातली सीमारेषा धूसर करत प्रत्येक प्रेक्षकाला मैफिलीत गायला लावलं, कधी एकट्याने तर कधी आमच्या दुसऱ्या लाडक्या ‘राहुल देशपांडे’ या आणखी एका भारी शास्त्रीय गायकासोबत. ‘मन मंदिरा’ गाण्यातल्या मान डोलायला लावणाऱ्या ताना तर शंकरजी, MK आणि RD यांच्यापेक्षा जास्त प्रेक्षकांनीच घेतल्या असतील. प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर वेगळ्या अर्थाने काजवे चमकवत कित्येक मैफिली जिंकल्या.
हां तर विषय होता त्या Newsroom चर्चेचा ! त्यात शेवटी त्याला एक पाश्चिमात्य गाणं म्हणायची एक वेगळी शिफारस केली गेली. MKने म्हटलं ते १९८५ सालचं एक पॉप गाणं ‘We are the world’. त्याने आधी त्या गाण्याची थोडी माहिती सांगितली आणि गाणं म्हणून दाखवलं. या गाण्याची पार्श्वभूमी थोडक्यात अशी की १९८५मध्ये त्या काळातल्या अनेक प्रसिद्ध गायकांना एकत्र घेऊन तयार केलेलं मायकल जॅक्सन आणि लिओनेल रिची’ यांनी लिहिलेलं हे गाणं आहे ‘We are the world (USA for Africa)’ for African Famine Relief. एक वेगळाच ‘महेश काळे’ या गाण्यातून पहायला आणि ऐकायला मिळाला. ते गाणं, त्याचा अर्थ हे एकीकडे, आणि त्यातच ती NRI votingची झालेली चर्चा डोक्यात होतीच ! त्या सगळ्याची डोक्यात झालेली भेळ आणि एकंदरीतच झालेल्या विचारमंथनाला शब्दरूप द्यायचा प्रयत्न करायचा आहे. पण त्याची लांबी आताइतकीच भयंकर मोठी होईल असं वाटतंय. त्यामुळे ते आता स्वतंत्रपणेच दुसऱ्या भागात.
(क्रमशः)
-कौस्तुभ दीक्षित
(२३-२-२०१७)

No comments:

Post a Comment