शब्दांच्या कंपित लहरी, ध्वनी अर्थाचा बहरी,
संगीत भावनांचे, गाते माझी कविता....
संगीत भावनांचे, गाते माझी कविता....
नियम रागदारीचे, बंधन वर्ज्य स्वरांचे,
गण-वृत्त-छंद जोपासे, मात्रांत बांधली कविता....
गण-वृत्त-छंद जोपासे, मात्रांत बांधली कविता....
सप्तसुरांच्या पोटी, गायन जन्मे ओठी,
स्वर-व्यंजन मीलन होता, अर्थाच्या गर्भी कविता....
स्वर-व्यंजन मीलन होता, अर्थाच्या गर्भी कविता....
चराचरातील नाद, अंतरी घालती साद,
तसेच अनुभवगाणे, गुणगुणते माझी कविता....
तसेच अनुभवगाणे, गुणगुणते माझी कविता....
साथसंगती वाद्ये, श्रोत्यांशी जोडी हृदये,
लिखित कागदाहाती, वाचक जगतो कविता....
लिखित कागदाहाती, वाचक जगतो कविता....
प्रतिभाविष्काराने, कवितेचे-संगीताचे,
अद्वैत सांगता संपे, इकडे माझी कविता....
अद्वैत सांगता संपे, इकडे माझी कविता....
-कौस्तुभ दीक्षित
१५-०२-२०१७
१५-०२-२०१७
No comments:
Post a Comment