Labels

Monday, July 29, 2013

संगमी श्रोतेजन नाहती

'गीत रामायण' : प्रतिभावान लेखक, पटकथाकार, कवी, गीतकार आदरणीय 'गदिमा' यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आणि स्वररत्न बाबूजी 'सुधीर फडके' यांच्या सुमधुर कंठातून साकारलेलं हे अनोखं काव्य, काव्य नव्हे तो एक ग्रंथच !! बाबूजींच्या ११व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दादरच्या शिवाजी मंदिरात त्यांचे सुपुत्र संगीतकार, गायक श्री. श्रीधरजी फडके यांच्या कंठातून ऐकायचा योग २७ आणि २८ जुलैला आला. असा कार्यक्रम होणार आहे याची माहिती असल्यामुळे तिकीटविक्री सुरु होताच लगेच जाऊन तिकीट काढलं.
मी २००५ मध्ये शिवाजी पार्कात झालेला गीत रामायणाचा सुवर्ण महोत्सव ('गीत रामायण ५० - ज्योतीने तेजाची आरती') हा कार्यक्रम प्रत्यक्ष बघितला होता आणि तेव्हापासून गीत रामायणाचा चाहता झालो होतो.  बाबूजींचा प्रत्यक्ष कार्यक्रम बघायला/ऐकायला मिळाला नाही पण श्रीधर फडकेंच्या तोंडून ऐकायची संधी यावेळी होती आणि दुधात साखर म्हणजे त्या कार्यक्रमाचं निरुपण माझ्या अतिशय आवडीच्या निवेदिका सौ. धनश्री लेले या करणार आहेत असं कळलं. तेव्हा हा दुग्धशर्करा योग चुकवायचा प्रश्नच नव्हता.
याआधी रवींद्र नाट्यमंदिरात धनश्रीताईंचंच निवेदन असलेल्या ज्येष्ठ गायक मा. श्री. अरुण दाते यांच्या 'शुक्रतारा' गाण्याच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाला मी गेलो होतो. त्यातलं धनश्रीताईंचं निवेदन मला अतिशय भावलं होतं. तेव्हा त्याबद्दल त्यांना 'फेसबुक'वर मेसेज पाठवला होता. त्यांनीही Reply केला होता आणि 'एखाद्या कार्यक्रमाला भेट' असं सांगितलं होतं. त्यामुळे त्याचीही उत्सुकता होतीच !
कार्यक्रम सुरू झाला आणि वातावरण गीत रामायणाच्या  मंगलमय सुरांनी भरून गेलं. 'स्वये श्री रामप्रभू ऐकती' पासून सुरू झालेला हा भारावून टाकणारा हा प्रवास पहिल्या दिवशी 'माता न तू वैरिणी' पर्यंत झाला. खरंच बाबूजींचा वारसा पुढे चालवण्याचं शिवधनुष्य श्रीधरजींनी किती समर्थपणे पेललंय ह्याची प्रचीती आली. सुधीर फडकेंनंतर गीत रामायणाचा वारसा पुढे चालवण्याचा वसा कोणी घ्यावा तर श्रीधर फडकेंनीच ! धनश्रीताईंचं निवेदन/निरुपण तर नेहमीसारखंच अप्रतिम !!

'सात स्वरांच्या स्वर्गामधुनी
नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी 
यज्ञमंडपीं आल्या उतरुनी
संगमी श्रोतेजन नाहती'

याची प्रचीती ठायीठायी येत होती. श्रीधरजींचे मधुरसे स्वर आणि त्याला अतिशय अनुरूप असं धनश्रीताईंचं रसाळ वाणीतलं निरुपण यांच्या संगमी श्रोतेजन न्हाऊन निघाले नसते तरच नवल ! तो स्वर्गस्थ रामचंद्र (बाबूजी) आपल्या एकुलत्या एक कुश-लवाचं म्हणजे श्रीधरजींचं गायन नक्कीच वरून ऐकत असणार !
पहिला दिवस संपला. मी लगेच जाऊन धनश्रीताईंना भेटलो. त्यांना नाव सांगितलं. त्यांनी लगेच ओळखलं. "हो हो, तू मेसेज पाठवला होतास; चला, भेटलास आज" असं म्हणाल्या. मी त्यांना कार्यक्रम खूप आवडल्याचं सांगितलं, त्यांच्याकडे सही मागितली. "अरे श्रीधरजींची सही घे, माझी कशाला ?" त्या म्हणाल्या. म्हटलं, "त्यांची घेतोच पण तुमचीही सही हवी आहे". मग हसत हसत त्यांनी सही दिली.

मी त्यांच्यासाठी त्यांच्या काही छायाचित्रांचं एक कोलाज Design केलं होतं. ते त्यांना भेट दिलं. ते बघून तर त्यांनी एकदम उत्स्फूर्तपणे "अरे वा" अशी दाद दिली. आणि पुन्हा एकदा कोलाज नीट न्याहाळलं आणि परत एकदा तशीच दाद दिली. खूप छान वाटलं.


मग श्रीधरजींकडे गेलो. बाबूजींचं आत्मचरित्र 'जगाच्या पाठीवर' माझ्या संग्रही आहे, त्यावर मला श्रीधरजींची सही हवी होती. त्यांना सही द्यायची विनंती केली. ते म्हणाले, "यात मी सुरुवातीला प्रस्तावना लिहिली आहे त्यावर सही करतो". असं म्हणून त्यांनी स्वतःहून ते पृष्ठ काढलं आणि त्यांच्या नावाखाली स्वाक्षरी केली. आणि अनपेक्षितपणे मला उद्देशून म्हणाले, "अशी तरूण मंडळी येतात कार्यक्रमाला, बरं वाटतं". आयुष्यात काही क्षण किंवा अनुभव सुरेख, अप्रतिम, अविस्मरणीय अशा शब्दांपलीकडचे असतात आणि त्यांची खरी किंमत फक्त तो क्षण अनुभवणाऱ्या त्या व्यक्तीलाच माहीत असते…. अशांपैकी हे क्षण होते. असो. मग धनश्रीताईंचा निरोप घेऊन गीत रामायणाच्या हवेतच घरी आलो.

दुसरा दिवसही पहिल्या दिवसासारखाच मंतरलेला होता. बाबूजींच्या 'सार्वकालिक महान' अशा 'पराधीन आहे जगती' या गीताने दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. सोबतीला धनश्रीताईंचं कालिदास, भवभूतीसारख्या महाकवींपासून अगदी लोककवींच्या कविता, लोककथांच्या उदाहरणांनी नटलेलं निवेदन आणि श्रीधरजींनी बाबूजी-गदिमांचे त्याकाळचे प्रसंग, किस्से सांगणं आणि गाण्यांच्या साथीला तितकाच उच्च दर्जाचा असलेला वाद्यमेळ यातून कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
धनश्रीताईंचं निवेदन हे मला एखाद्या शांत नदीप्रवाहासारखं वाटतं. कुठे चमकदारपणा नाही. आपण त्या नदीच्या काठावर बसून फक्त निवांतपणे त्याचा आस्वाद घ्यायचा ! आणि शेवटी गंगेत स्नान केल्याचं पुण्य आणि आनंद आपल्या पदरी पडणार ह्याची खात्री :) तसंच अपेक्षेनुरूप इथेही झालं. आणि श्रीधरजींबद्दल मी काय सांगावं !! मी भक्तिगीतं ऐकणाऱ्या पंथातला अजिबातच नाही. मी स्वतःहून ऐकलेलं शेवटचं भक्तिगीत म्हणजे 'सुमन कल्याणपूर' यांचं 'केशवा-माधवा', तेसुद्धा इ. ६वीत. त्यामुळे भक्तिरसात न्हाऊन निघणं वा तत्सम प्रकार फक्त ऐकण्या-वाचण्यापुरताच मर्यादित ! पण तोही अनुभव या कार्यक्रमाने दिला.
शेवटी जिथून सुरू झाला (स्वये श्री) त्याच बिंदूला म्हणजे 'गा बाळांनो श्री रामायण'पाशी येऊन कार्यक्रम संपला. एकच गोष्ट खटकली ती म्हणजे श्रोते असायला हवेत तितके Responsive नव्हते. बहुधा ज्येष्ठ नागरिकांचाच जास्त भरणा असल्यामुळे असेल. असो. :D
पुन्हा एकदा धनश्रीताईंना भेटलो आणि कार्यक्रम आवडल्याचं सांगितलं. त्यांनीही कोलाज घरी आवडल्याचं आवर्जून  सांगितलं. पुन्हा भेट कधी एखाद्या कार्यक्रमाला असं म्हणाल्या. कार्यक्रमाच्या आठवणी जागवतच घरी आलो आणि आता मोबाईलच्या Playlistमध्ये गीत रामायणाची आणखी काही गाणी Add झाली आहेत हे वेगळं सांगायला नकोच :)

Monday, June 17, 2013

I HATE RAIN !!!

पाऊस  सगळ्यांनाच आवडतोच असं नाही. काहींच्या जुन्या गाडलेल्या आठवणी पावसाबरोबर जाग्या होतात…. त्याचा त्यांना त्रास होतो… आणि त्यांच्या तोंडून नकळत विरहवेदना बाहेर पडतात. अभीरही अशांतलाच एक !! पाऊस आला की त्याच्या श्रुतीसोबतच्या आठवणी पुन्हा जाग्या होतात पण आता त्यांना राधाच्या आठवणींचं त्या वेदना सुसह्य करणारं औषध मिळालं आहे. 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ही मालिका माहित असेल्यांना हे संदर्भ आणि I Hate Rain माहित असेल पण समजा माहीत नसलं तरीही या कवितेतल्या भावना नक्कीच समजू शकतील, कारण… 'कविता ह्या समजायच्याच नसतात, समजायच्या असतात त्या भावना…' :)

माझी मैत्रीण निकिता आवारे हिने व्यक्त केलेल्या अभीरच्या या पाऊसवेदना….


I HATE RAIN 
पावसाची संततधार
गोठवून टाकणारा गार वारा 
माती आणि धारांच्या मीलनाच्या आनंदाने बेभान होऊन 
रस्त्यांवरून फेसाळत वाहणाऱ्या त्या इवल्या इवल्या सरिता
हे… 
हे सगळं चुकवत 
मी दुकानाच्या शेडच्या आडोशाने उभं रहावं 
आणि आपल्याच आनंदात भुर्रकन जाणाऱ्या एखाद्या गाडीनं 
जाताना मला नखशिखांत चिखलाचा अभिषेक घडवावा 
You know what Radha 
I  HATE RAINS… !!!

ते आभाळअश्रू झेलून चिल्ल्यापिल्ल्यांनी मनसोक्त नाचताना 
मला मात्र 
फक्त त्यांच्या पायाखालचं चिखल दिसावं 
कुणी पावसात भिजायला मिळावं म्हणून छत्री घरी मुद्दाम विसरावी 
आणि मी मात्र बरसणाऱ्या सरींवर बहिष्कार म्हणून 
स्वतःच्या खोलीत बंद व्हावं 
प्रेमात पडलेल्या माझ्या मित्राला
कोसळणाऱ्या थेंबांत सप्तसुरांचा नाद गवसावा
पण मला नेहमी 
पत्र्यावर आपटून पाण्याने 'ताड् ताड्...' असा माजवलेला तांडवच दिसावा…. 
You know what Radha 
I  HATE RAINS… !!!

पावसाच्या येण्याबरोबर मग
चोरपावलांनी श्रुतीची आठवण यावी 
मित्राच्या पावसाची सरगम 
अनाहूतपणे कानी वाजू लागावी 
आणि थेंबाथेंबागणिक 
तिच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण ,मनावर कडकडून कोसळावा… 
आकाशाचं ते रुदन माझ्याच विरहकळांचा प्रतिध्वनी वाटावा… 
वाढत जाणाऱ्या पावसाबरोबर सगळं कसं असह्य व्हावं 

अचानक पाऊस थांबावा… 
पाऊसधारांत न्हाऊन निघून हवा पण अगदी स्वच्छ भासावी… 
इतका वेळ मिटलेले डोळे अलगद उघडावे… 
आणि…. 
राधा समोर तू दिसावीस… 
You know what Radha 
I…. 
-निकिता आवारे

Sunday, June 9, 2013

पाऊस - एक अतृप्त मैफिल

पावसामुळे चराचर सृष्टी मोहरून उठते, चैतन्य येतं हे जरी खरं असलं तरी एखाद्याचा जर आधीच उदास स्वर लागला असेल तर तो उदास प्राणी अजून उदास होऊन जाऊ शकतो आणि सगळं मिळूनही रिक्तपणाच उरतो फक्त !!


काय मस्त हवा सुटलीय
शरीराशी झोंबून मनाला आल्हाद देऊ पाहतेय
पावसाचे तुषार अंगाखांद्यावर नाचतायत
मी मात्र नुसता उदास उभा आहे फक्त

भोवताली अंधार दूरवर एक लुकलुकता दिवा
कानात गुंजती सूर कोणीतरी वाजवी पावा
ध्वनी-प्रकाशाचा विजोड तरी एक खेळ नवा
त्याचा एक मूक प्रेक्षक मी खेळ बघतोय विरक्त

एकटेपणाच्या कोशात माझं छोटंसं घर
बाहेर पडणारी पावसाची हळुवार सर
तरीही का लागावा आज हा दुःखी स्वर
या जगात राहूनही मी जगापासून अलिप्त

मल्हाराची मुसळधार आळवणी तर सारखीच चालू असते
मध्येच अचानक ताशासारखी आकाशात वीज कडाडते
पागोळ्यांची सुरावट तर सतत लेहरा धरतच असते
या श्रवणीय श्रावणमैफिलीतून मी मात्र मुक्त

नांदीपासून भैरवीपर्यंत ही मैफिल रंगते
उत्कटतेच्या समेवर येऊन पावसाची जुगलबंदी संपते
माझी मात्र अखेरच्याही तिहाईची टाळी चुकते
सारे काही अनुभवूनही मी मात्र अतृप्त

Friday, May 10, 2013


कविता कधी, कुठे, कशी सुचेल ह्याचा काही नेम नाही. गदिमांना ती कधी हॉटेलमध्ये बसलेले असताना (दर्यावरी नाच करी, होडी चाले कशी भिरीभिरी) सुचते आणि ते बसच्या तिकिटावर लिहितात तर सुरेश भटांना टॅक्सीत सुचतं (सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे, अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे) आणि ते मिळेल त्या कागदावर लिहितात. मी गदिमा किंवा सुरेश भट नाही तरी पण शेवटी ही कविता मला सुचली अशाच एका Weird वेळी (रात्री झोपायची तयारी करत असताना) सुचली. खरं म्हणजे कवितेचा विषयही २३व्या वर्षी सुचावा असा नाही. पण काय आता,  सुचली !!  नशिबाने आजकाल मोबाईल हाताशी असल्यामुळे अगदी तिकिटावर किंवा मिळेल त्या कागदावर लिहिण्याची वेळ येत नाही इतकंच !!
कधी नव्हे ते यमक, वृत्त  इत्यादींचा वापर करावासा वाटला नाही.
'एक असा वयस्क माणूस ज्याची जीवनसाथी त्याला कायमची सोडून निघून गेली आहे अशा माणसाच्या भावना या कवितेत आहेत.'



रात्रीच्या मिट्ट काळोखात
चांदण्या चमचम करतायत
पण माझ्या आकाशातलं शीतल चांदणं
कायमचं हरवलंय

सतत वाटत राहतं
शुक्लातल्या प्रतिपदेसारखी
किंवा वद्यातल्या चतुर्दशीसारखी
छोटीशी का होईना पण निदान एक कोर दिसेल कुठेतरी
पण समजूनसुद्धा उमजत नाही
आयुष्यात माझ्या कायमची आमावस्या केव्हाच झालीय

उरल्यात त्या फक्त आठवणी
प्रतिपदा ते पौर्णिमेसारख्या
आपल्या कलाकलाने वाढलेल्या प्रेमाच्या
आता हा अंधार मात्र माझा कायमचा सोबती झालाय

रामप्रहरी आयुष्याच्या आपली पहिली भेट झाली
अष्टौप्रहर साथ दिलीस
उद्या दिनचक्राप्रमाणे दिवस सुरू होईल खरा
पण माझ्या रथाचं चाक मात्र तुझ्याच आठवणींत रुतलंय

याच आठवणींची मऊसूत शाल
ओढून बसतो एकटाच खाली
वर सोबतीला आभाळाच्या चादरीवर चांदण्यांनी नक्षी रेखलेली
पण तुझ्या प्रेमाची ऊब त्याला कधीच नाही हे कळून चुकलंय

बघत बसतो टक लावून शोधत त्या ताऱ्यांत तुला
कारण म्हणे सोडून गेलेल्या प्रियजनांचे तारे होतात
पण मनात ध्रुवताऱ्यासारखं अढळपद मिळवून
मला हवाहवासा तारा मात्र केव्हाच निखळलाय

शोधतोय वाट याच तारांगणातून स्वर्गाकडे नेणारी
येशील तू बाहू पसरून मला जिथे सामोरी
मिठीत त्या सामावले असेल सारे विश्व सारे आकाश
दिपेल चराचर सृष्टी पाहून प्रीतीचा सूर्यप्रकाश

Tuesday, April 30, 2013

मैत्री म्हणजे काय




मैत्री म्हणजे काय

एकाची साद सगळ्यांचा प्रतिसाद

कट्टयाच्या साक्षीने कटिंगचा आस्वाद



मैत्री म्हणजे काय

शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर गप्पांची मैफिल

वेळेचं भान नाही सारेच गाफील



मैत्री म्हणजे काय

मोठ्या मोठ्या प्लॅन्सच्या बड्या बड्या बाता

वडापाव फ्रँकीनंतर आईस्क्रीम खाता खाता



मैत्री म्हणजे काय

पास व्हा किंवा नापास व्हा सगळ्यांना हवी पार्टी

एक नंबरची नालायक आहेत सगळी कार्टी



मैत्री म्हणजे काय

नोट्सच्या झेरॊक्स आणि असाइनमेण्ट्स कॊपी

अभ्यासाची ही पद्धत आहे खूप सोपी



मैत्री म्हणजे काय

कॊलेजला दांडी किंवा  लेक्चर बंकिंग

नाक्यावर उभं राहून रोजचं 'साइटसीइंग

'

मैत्री म्हणजे काय

गुपचूप बघितलेला दुपारचा पिक्चर

घरी कळल्यावर  मिळालेलं लेक्चर



मैत्री म्हणजे काय

एकमेकांना जोडणारा विश्वासाचा सांधा

दुःखामध्ये रडायला हक्काचा खांदा



मैत्री म्हणजे काय

फेसबुकने जोडलेली मैत्रीची गॅप

इन्स्टंट गप्पांसाठी मोबाईलवर व्हॊट्स्-ऄप



मैत्री म्हणजे काय

अध्यात्मिक ते रोमँटिक सगळ्या विषयांवर गप्पा

प्रत्येकासाठी जपलेला मनातला एक-एक कप्पा



मैत्री म्हणजे असतं अजूनही बरंच काही

लिहित बसलो सगळं तर जागा पुरणार नाही



एवढं सगळं असताना आणखी वेगळं काय हवं

आयुष्याच्या क्षितिजावरती रोज दोस्तीचं रूप नवं