Labels

Wednesday, February 15, 2017

काव्यसंगीत


शब्दांच्या कंपित लहरी, ध्वनी अर्थाचा बहरी,
संगीत भावनांचे, गाते माझी कविता....


नियम रागदारीचे, बंधन वर्ज्य स्वरांचे,
गण-वृत्त-छंद जोपासे, मात्रांत बांधली कविता....


सप्तसुरांच्या पोटी, गायन जन्मे ओठी,
स्वर-व्यंजन मीलन होता, अर्थाच्या गर्भी कविता....


चराचरातील नाद, अंतरी घालती साद,
तसेच अनुभवगाणे, गुणगुणते माझी कविता....


साथसंगती वाद्ये, श्रोत्यांशी जोडी हृदये,
लिखित कागदाहाती, वाचक जगतो कविता....


प्रतिभाविष्काराने, कवितेचे-संगीताचे,
अद्वैत सांगता संपे, इकडे माझी कविता....


-कौस्तुभ दीक्षित
१५-०२-२०१७

Wednesday, December 21, 2016

The English Winter #2

आधी स्वेटर कपाटातून बाहेर आले, मग एक एक करून जॅकेट, थर्मल्स, कानटोपी, हँडग्लव्ह्स अशी एक एक आयुधं बाहेर निघू लागली. ‘नेमेची येतो मग हिवाळा’ किंवा ‘Winter is coming’ उक्तीला जगून थंडीने आपला दरारा दाखवायला सुरुवात केली. GoTमध्ये थंडीला उगाच घाबरत नाहीत लोक ! Whitewalkers हे एक कारण आणि थंडी हे दुसरं.
धुक्याचं साम्राज्य वाढू लागलं, बहुतेक झाडं पानांविना ओकीबोकी दिसू लागली. आता थंडीचा ‘गुलाबी’ वगैरे रंग फिका पडून ती गुलाबाच्या काट्यांसारखी बोचरी झाली. गुलाबी जाऊन बर्फाचा पांढरा दिसायची वेळ आली. पारा दोन अंकी वाचन दाखवेनासा झाला. कधीतरी आदल्या रात्रीच्या जास्त उतरलेल्या पाऱ्याने दवालाही गोठवून टाकलं. एरवी बसमधून ऑफिसला जाताना हिरवी दिसणारी शेतं त्या गोठलेल्या दवाने (Frost) थेट एका रात्रीत पांढरी दिसू लागली. गाड्यांचे पांढरे झालेले टप सकाळच्या उन्हात चमकू लागले. सूर्यदेवही थंडीत स्वतःला गुंडाळून घेऊ लागल्यामुळे सकाळ साडेसातच्या पुढे होऊ लागली आणि दुपारी ३.३०-४ वाजताच संध्याकाळचे सात-साडेसात वाजल्यासारखं वाटू लागलं. परिणामी, लोकही स्वतःला घरात लवकर कोंडून घेऊ लागले. रस्ते काहीसे लवकरच सुने पडू लागले.
आता हेही रोजचंच झालं. पण जसे दिवस पुढे पुढे सरकू लागले आहेत तसतसे हळूहळू छोटे छोटे बदल दिसू लागले आहेत. लंडनची जत्रा अर्थात् Winter Wonderland सुरू झालं आहे, मॉल्स, दुकानात Discountचे बोर्ड दिसू लागले आहेत, नव्या रोषणाईने हळूहळू झाडं चमकू लागली आहेत, रस्ते रात्रीचे पुन्हा नव्याने उजळू लागले आहेत, दिवे, फुगे, इटुकल्या घंटा, रंगीत इवलेसे गोळे यांनी घरं, अंगणं आणि अगदी ऑफिसंही सजू लागली आहेत. ऑफिसात कामं संपवायची घाई होऊ लागली आहे. नव्या वर्षाची सुरुवात जोमाने करण्यासाठी त्या आधीच्या सुट्टीचे वेध लागले आहेत. प्रत्येकाच्या आतला सुप्त उत्साह आता दिसू लागला आहे. सबवेमधले भिकारी, किरकोळ विक्रेते, दुकानं, तमाम जनता, वाळलेली झाडं, दाटलेलं धुकं आणि सगळ्या चराचरालाच त्या गोंडावाल्या लाल-पांढऱ्या टोपीचे वेध लागले आहेत. दरवर्षीप्रमाणे काही दिवसांतच घरोघरी एक नवीन जन्म होईल, घरोघरी एक म्हातारबाबा गुप्तपणे येऊन जाईल. नवीन वर्ष चांगलं जाण्यासाठी घरोघर बाळाकडे प्रार्थना केल्या जातील. म्हातारबाबा भेटी ठेवून जाईल. Jesus is coming, Santa is on his way and ‘Christmas’ is just round the corner....

-कौस्तुभ दीक्षित
(२१ डिसेंबर, २०१६)

Saturday, December 17, 2016

|| दुभंग ||

आमुचीच भुते | आमुच्याच वर |
परतून वार | तोच जुना |


आमुच्यासाठी जी | उलटी पावले |
आज मिरविती | शुभचिन्हे |


आमुच्या गळ्याला | चिरून मरण |
दुसऱ्यांच्या कंठी | मणिहार |


आम्हालागी झोंब | लिंबू मिरचीची |
कुणीसे लाभार्थी | साखरेचे |


राशीला आमुच्या | मंगळ नि शनी |
तिथे शुभस्थानी | शुक्रतारा |


झळाळते आज | वस्त्र जरतारी |
पांढरे निशाण | पुसोनिया |


फुटक्या घटाशी | ठोकताना बोंब |
मांडवात स्वर | मंगलाचे |


स्वर्गारूढ झाला | जरी धर्मराजा |
हिंडे तेलासाठी | अश्वत्थामा |


-कौस्तुभ
५-१२-२०१६

Friday, May 1, 2015

समाजाचं ऋण, समाजाचं देणं

महाराष्ट्र दिनी RAVAच्या सामाजिक कार्याचा वृत्तांत Admin सचिन जाधव याच्या शब्दांत !

महाराष्ट्र दिवशी काहीतरी करुया यावर माझ आणि पंकज गांगणचं बोलणं सुरू होतं. त्यात त्याने एक विषय सांगितला की, आमच्या कंपनीमध्ये काही लोक आदिवासी पाडे असतात त्यांना भेट देतात आणि काही गरजेच्या वस्तू पुरवतात. या लोकांमधे आपल्या ग्रुपमधला देव पवार पण असतो. मग मी म्हटलं आपण इथेही हेच करुया. असेही आपल्याकडे दिवाळीच्या वेळी शिल्लक राहिलेले २५०० रुपये होतेच की तेच वापरूया किंवा अजून काही लागले तर आपण contribution करूया.
त्यादिवशी आमचं हे बोलणं GT च्या प्रॅक्टिसच्या दिवशी सर्वांसमोर सांगितलं. सर्वांना तो उपक्रम आवडला. त्याचवेळी म्हटलं हा उपक्रम आपण WARA (We Are RAVA Admins) टीम स्थापन करून त्यांच्याकडे देऊया. त्यावेळी विचारणा केली की कोण कोण उत्सुक आहे ? सचिन मोकळ, मृणाल आणि अनिता पाटील म्हणाले आम्ही लीड करायला तयार आहोत. त्यात अजून एक नाव अॅड केलं ते म्हणजे देव पवारचं. कारण त्याने हे आधी केलं होत. त्यामुळे 4 जणांची WARA टीम तयार केली.
अन्नधान्य वाटप करायचं तर आहे पण कुठे करायचं नक्की ? ठिकाण शोधाशोध् सुरु झाली. ते final होत असताना मी थोडा वेगळा विचार करू लागलो. सुशांत शेलार यांना जेव्हा भेटलो होतो तेव्हा ते म्हणाले होते ते लवकरच 'Be Maharashtrian' ही संस्था सुरू करणार आहेत त्या अंतर्गत काही सामाजिक कार्यही हाती घेणार आहेत. म्हणून मी त्यांना फोन केला की दादा आम्ही असा एक उपक्रम राबवणार आहोत. तुझी संस्था आमच्या बरोबर आली तर आम्ही मोठ्या पातळीवर हे करू शकतो. तो लगेच तयार झाला, मला म्हणाला किती लागतील ते सांग उपक्रमाला मी माझ्यातर्फेसुद्धा मदत करन. त्यावर मी त्याला म्हटलं सर्व गोष्टी हिशोबासकट सांगतो आणि कळवतो तुला.
मग आमचं शहापूर येथे जायचं ठरलं. तिथे काही आदिवासी पाडे आहेत त्यांना खरंच गरज आहे या वस्तूंची म्हणून आम्ही तिथे जायचं ठरवलं. सुशांत दादाला हिशोब सांगितला मग त्याने त्याच दिवशी आर्थिक मदत पाठवतो सांगितलं अणि पाठवलीसुद्धा !
कालच आम्ही काहीजण ठाण्यातील एका होलसेलच्या दुकानात गेलो. तिथून खरेदी केली आणि सर्व सामान वेगळं वेगळं करून ठेवायला त्या दुकानदाराला सांगितल. सकाळी त्याच दुकानातून सामान तसंच्या तसं ठाणे स्टेशनला घेऊन जायचं होत. त्यामुळे सर्वांनी वेळेत या सकाळी असं सांगून निघालो :)
आज सकाळी आम्ही काहीजण वेळेत आलो. त्या दुकानातून सामान आणण्यासाठी मी, मोकळ, हरेश, योगेश आणि पंकज गेलो. रिक्षामध्ये सामान टाकून ते आम्ही स्टेशनला आणलं. तरीही काहीजण अजूनही आले नव्हते. मग आम्ही पुढे जायचं ठरवलं. अजिंक्य आणि मृणाल हे दोघं अनितासाठी ठाण्याला थांबले. आम्ही वाशिंदला उतरलो तरी हे ठाण्यालाच होते. वाशिंदला नाश्ता केला तरीही ह्यांना ट्रेन मिळाली नव्हती. शेवटी आम्ही पुढे जायचं ठरवलं.
आपल्या RAVA मधला स्वप्नील दळवी हासुध्दा आमच्याबरोबर आला होता. तो वाशिंदलांच राहतो. त्याने सकाळी मला कॉल केला होता की आलास की कॉल कर, मी भेटतो. माझ्याआधी त्यानेच कॉल केला. तो आला स्टेशनला आणि आम्हाला भेटला. शिवाय देव पवारचा मित्र ज्याने ती आदिवासी वस्ती शोधली तोही होता आमच्याबरोबर. आमचा नाश्ता होइपर्यंत स्वप्नील आणि देवच्या मित्राने एका गाडीची व्यवस्था केली. आम्ही २० जण मग तिथे पोचलो.
एक एक करत सर्व पाडयातील घरांतील लोकांना आणलेले धान्य व वस्तू वाटत गेलो. सर्व त्या पाड्यातील लोकांनी त्या वस्तू आनंदाने स्वीकारल्या. तेथील काही घरं अशी होती की खरंच त्या लोकांना या वस्तूंची गरज होती. हे वाटप झाल्यानंतर आम्ही आमचे पाय देवच्या मित्राच्या घराच्या दिशेने वळवले. कारण त्याच्या मित्रान् जेवनाची सोय केली होती. आम्ही तिथे पोचलो तेव्हा अजिंक्यचा कॉल आला आम्ही इथे पोहचलोय मग मी आणि स्वप्नील दोघे त्यांना घ्यायला गेलो. त्यांना घेऊन आल्यावर सगळे जेवायला बसलो. त्यानंतर फोटोशूट सुरू झालं आणि मग परतीचा प्रवास सुरू. शिस्तबद्धरीत्या हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. त्यासाठी WARA टीमचं अभिनंदन तसंच देवच्या मित्राचे आणि स्वप्नील दळवीचे विशेष आभार ! तसंच जे जे या उपक्रमासाठी आले त्यांचेही आभार ! तसंच सुशांत शेलार आणि त्यांच्या 'Be Maharashtrian' संस्थेचे आम्हाला हे कार्य पार पाडण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल विशेष आभार ! _/\_
एक उत्तम उपक्रम या चांगल्या दिवशी पार पडला हे खरच वाखाणण्याजोगं आहे. म्हणूनच आम्ही अभिमानाने म्हणतो 'राव आमचं वेगळं आहे' ^_^
सचिन जाधव
Admin,
'राव आमचं वेगळं आहे'  ग्रुप
https://www.facebook.com/groups/AamchaVegalaAhe
https://www.facebook.com/RAVAgroupOfficial
www.ravaofficial.com
https://www.twitter.com/RAVA_Official

Tuesday, March 4, 2014

स्वप्न वाजे कानी का....



स्वप्न वाजे कानी का ना कळे झाले कसे
अंतरीची धून की कुणी मधुवंतिस्वर छेडीतसे

दाटतो का स्वप्नसौरभ गंधाळलेली तू अशी
दरवळे स्वप्नीही का पाकळी नाजूकशी

अर्धोन्मीलित नेत्रांतुनी रूप मोहक पाही ते
सौंदर्यपूजकाला दिसे ते स्वप्नातही जे नाही ते

ना चवी ना वाणीही तरी माधुरी निःशंक राहे
बोलणे अर्थपूर्ण जरी स्वप्नमग्नही वेळ आहे

रोमांच अंगी राहिले उभे येऊन अंतीही
स्वप्नी येऊन भासती स्पर्श घेऊन प्रीतीही

पंचेंद्रिये एकत्रिताने चेतनेला सांगती
स्वप्न नाही सत्य हे तर ही असे प्रेमानुभूती

-कौस्तुभ दीक्षित (४ मार्च २०१४)