वीकडेला हे कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही पुढचं तिकीट बुक केलं होतं ते म्हणजे मुख्य आकर्षण असलेला रविवारचा पंडित शिवकुमार शर्मा आणि राहुल शर्मा यांचं संतूरवादन !! साथीला अर्थातच पंडित योगेश समसी. मी यापूर्वी सोलो संतूर वादन कधी असं कार्यक्रमात ऐकलं नव्हतं पण मला संतूर या वाद्याचा आवाज आवडतो. त्यात साक्षात पंडित शिवकुमार शर्मा वाजवणार असल्यामुळे उत्सुकता जास्त होती. हा कार्यक्रम बार्बिकन सेंटरच्या मुख्य वास्तूत होता. नाट्य आणि संगीत यांच्या शिक्षणासाठी एवढी मोठी वास्तू पाहून आम्ही अक्षरशः अवाक झालो !! तिथे असलेला कॅफे, तिथे निवांत बसण्याची मोठी सोय, त्या केंद्राचं तिथे मोफत ठेवलेलं नियतकालिक, बाजूलाच मोठी टेरेस... या, बसा, निवांत कार्यक्रम एन्जॉय करा... एक पूर्णानुभवच जणू ! फक्त कार्यक्रमाच्या वेळेपुरते नाही तर त्या वास्तूत प्रवेश केल्यापासून हा अनुभव सुरू होतो. कलेसाठी पोषक अशा वातावरणात एखाद्या सच्च्या होतकरू कलाकाराची कला नक्कीच पूर्ण बहरत असणार. प्रत्यक्ष सभागृहाचे फोटो आणि 3D view तिकीट बुक करतानाच त्यांच्याच साईटवर उपलब्ध होते. पण एखादा सिनेमा थिएटरमध्ये पाहणं आणि मोबाईलवर पाहणं हा जितका फरक असतो तितकाच फरक 3D view आणि प्रत्यक्ष हॉल यांच्यात होता. अकराशेहून अधिक प्रेक्षक क्षमता, मोजताना काऊंट हरवावा इतके स्टेज आणि ऑडिअन्स लाईट्स, स्टॉलपासून बाल्कनीपर्यंत उंचीची असलेली ध्वनिव्यवस्था.... इतक्या भन्नाट सज्जतेचे फोटो काढल्याशिवाय रहावलं नाही. अर्थातच प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणारं ते सौंदर्य कॅमेऱ्यात आलं नाहीच !
अखेर कार्यक्रम सुरू झाला. थीम होती Midnight Ragas. आधी बुधादित्य मुखर्जी यांचं 'दरबारी कानडा' रागात सुंदर सतारवादन झालं आणि मग ज्याची सर्व रसिक अत्यंत आतुरतेने वाट बघत होते तो क्षण जवळ येऊन पोचला. तानपुऱ्यावर बसणार असलेले पंडितजींचे जपानी शिष्य ताकाहिरो आराई, तबल्याची साथ करणारे पंडित योगेश समसी आणि शिवजींचे सुपुत्र आणि शिष्य संतूरवादक राहुलजी शर्मा यांचं स्टेजवर टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत झालं आणि नंतर चौथ्या क्रमांकावर सचिन किंवा आता विराट येताना होतं तसं टाळ्यांच्या न थांबणाऱ्या कडकडाटात स्टँडिंग ओव्हेशन घेत साक्षात निळा कुडता परिधान केलेले पंडित शिवकुमार शर्मा मंचावर सावकाश पावलं टाकत आले...
सगळी वाद्य स्वरात मिळवून झाल्यानंतर एक आविष्कार साकार होऊ लागला. पंडितजींनी राग जोग निवडला होता. संतूरसारख्या कर्णमधुर नादनिर्मिती करणाऱ्या वाद्याला पखावजी पद्धतीच्या तबला वादनाची साथ खास पद्धतीचा डग्गा वापरून योगेशजी करत होते. पितापुत्रांची अप्रतिम जुगलबंदी संपूर्ण सभागृह प्राण कानांत आणून जणू ऐकत असावं. अशा उच्चतम वादनाला तबल्यावर योगेशजींची सुरेख साथ आणखी वेगळ्याच उंचीवर नेत होती. मध्येच राहुलजींनी संतूर वाजवायचे एका हातातले कलम (काठी) बाजूला ठेवून हाताने संतूरच्या तारांवर आघात करत केलेलं वादन मला एका कुठल्याश्या कलेच्या उच्चतम पातळीची अनुभूती देऊन गेलं. क्षणाक्षणाला दोन्ही संतूर आणि तबला प्रतिभेचे नवनवे कळस पेश करत होते. आणि एका बिंदूवर समेवर आलेली तिहाई.... त्या समेच्या बिंदूचा क्षण वर्णन करण्यापलीकडचा होता. संपूर्ण सभागृह कानठळ्या बसतील इतका टाळ्यांचा कडकडाट करू लागलं, आणि बेभान होऊन तो कडकडाट चालूच राहिला... जोग रागानंतर त्यांनी राग नंद सादर केला.
शेवटच्या भागात जम्मूमधल्या (पंडितजींचं जन्मस्थान) लोकगीतातली एक धून घेऊन त्यावर शिवजींनी स्वतःच्या कौशल्याने भर घालून पहाडी रागात केलेला वादन सादर केलं. यथावकाश कार्यक्रम संपला... संपू नये असं वाटत होतं तरी संपला. स्टेजवरून उठून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत मंचावरून उतरून पंडितजी बाहेर ग्रीनरूमकडे जाऊ लागेपर्यंत स्टँडिंग ओव्हेशन आणि टाळ्या थांबल्या नाहीत. पहाडी रागातली ती धून डोक्यात वाजतच भारावलेल्या अवस्थेत आम्ही बाहेर आलो. श्रोत्यांतले फक्त भारतीयच नव्हे तर उपस्थित युरोपीय श्रोत्यांच्यातही हे भारावलेपण होतं. पंडितजींबद्दल नव्यानेच कळलेला आणि त्यांना पहिल्यांदाच ऐकलेला त्यातलाच कोणी एकजण सोबतच्या भारतीयाला घेऊन शिवजींना भेटण्यासाठी धावला. अशा प्रकारे थोरामोठ्या परम वंदनीय प्रतिभावंतांमुळे भारतीय संगीत, त्याची थोरवी, त्याची अलौकिकता भाषेचं बंधन तोडून जगभरात पोचत असल्याचं पाहून एक आंतरिक समाधान वाटत होतं.
'देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे
देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती
वाळवंटातूनसुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती
देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पार्यासारखे'
बोरकरांना या ओळी अशाच अनेक प्रतिभावंतांकडे पाहून सुचल्या असाव्यात.
फक्त संतूर मॉम्स नाही, संतूर वादकही त्यांच्या कलेतून चिरतरुण राहत असावेत... 😊
-कौस्तुभ दीक्षित
No comments:
Post a Comment