मध्यंतरानंतर पुढचा कार्यक्रम होता कला रामनाथ यांचं व्हायोलिन वादन. मी ऐकलेला बहुधा तबला आणि पेटीव्यतिरिक्त हा पहिलाच वादन कार्यक्रम असावा. मागे म्हटल्याप्रमाणे तबल्यावर साथीला होते पंडित योगेश समसी. पहिल्या रांगेतल्या सर्व ज्येष्ठश्रेष्ठ कलाकारांना वंदन करून कला रामनाथांनीं व्हायोलिनच्या तारांवर राग चंद्रकंस छेडला. प्रत्येक कलाकाराची सादरीकरणाची एक पद्धत, रादर एक 'स्टाईल' असते. भीमसेनजींसारख्या मोठे कलाकारात त्यांचा आब दिसतो, राहुल देशपांडेंचं वीज कडाडल्यागत गायन, महेश काळे श्रोत्यांना सोबत घेऊन जाणारं गाणं, झाकिरभाईंचा सुज्ञ-अज्ञ अशा सर्व रसिकांचा आ वासत जिंकत जाणारा तबला आणि असे अनेक ! कला रामनाथ यांच्याकडे बघून पहिला नजरेत भरला तो त्यांचा साधेपणा ! अर्थात 'साधेपणा' आणि 'नजरेत भरला' या दोन विरोधी गोष्टी झाल्या. कदाचित तो माझ्या receptionचा दोष असू शकेल. पण त्यांना बघितल्या बघितल्या कुणीतरी आपल्याच घरातली एखादी ताई-काकू-आत्या-मावशी वाटावी इतका साधेपणा, वादन करताना चेहऱ्यावर एक मंद स्मित आणि तल्लीनता. योगेशजींच्या साथीच्या तबल्याला मधूनच जाणारी एखादी दाद आणि त्यातून दिसणारा साथीच्या ज्येष्ठ कलाकाराबद्दलचा आदर. आणि अर्थातच विलंबित लयीतून हळूहळू द्रुताकडे जाणारं कमाल वादन !! अहाहा, शास्त्रीय संगीताचं ज्ञान नसलं पण रसिक कान असतो. मनात कलाकार' या व्यक्तीबद्दल आदराची भावना असते. शिवाय नवीन काही अनुभवण्याची इच्छा असते. हे सगळं असलं की ही जाणीव असते की शास्त्रीय कसोट्यांवर समोरच्या कलाकाराला तोलायची आपली पात्रता नाहीच नाही, पण त्या मैफिलीचा रागदारीपलीकडे आस्वाद घेता येतो, as a whole package. तसा आस्वाद घेता घेता जाणवलं की 'व्हायोलिन हे करुण स्वर उत्पन्न करणारं वाद्य आहे' हा समज असे मोठे कलाकार खोटा पाडतात. व्हायोलिनच्या त्या तारांनी निर्मिलेल्या त्या स्वरात तरंगत आम्ही घरी आलो.
-कौस्तुभ दीक्षित
No comments:
Post a Comment