Labels

Wednesday, October 23, 2019

May Indian classical music live forever - 3

वीकडेला हे कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही पुढचं तिकीट बुक केलं होतं ते म्हणजे मुख्य आकर्षण असलेला रविवारचा पंडित शिवकुमार शर्मा आणि राहुल शर्मा यांचं संतूरवादन !! साथीला अर्थातच पंडित योगेश समसी. मी यापूर्वी सोलो संतूर वादन कधी असं कार्यक्रमात ऐकलं नव्हतं पण मला संतूर या वाद्याचा आवाज आवडतो. त्यात साक्षात पंडित शिवकुमार शर्मा वाजवणार असल्यामुळे उत्सुकता जास्त होती. हा कार्यक्रम बार्बिकन सेंटरच्या मुख्य वास्तूत होता. नाट्य आणि संगीत यांच्या शिक्षणासाठी एवढी मोठी वास्तू पाहून आम्ही अक्षरशः अवाक झालो !! तिथे असलेला कॅफे, तिथे निवांत बसण्याची मोठी सोय, त्या केंद्राचं तिथे मोफत ठेवलेलं नियतकालिक, बाजूलाच मोठी टेरेस... या, बसा, निवांत कार्यक्रम एन्जॉय करा... एक पूर्णानुभवच जणू ! फक्त कार्यक्रमाच्या वेळेपुरते नाही तर त्या वास्तूत प्रवेश केल्यापासून हा अनुभव सुरू होतो. कलेसाठी पोषक अशा वातावरणात एखाद्या सच्च्या होतकरू कलाकाराची कला नक्कीच पूर्ण बहरत असणार. प्रत्यक्ष सभागृहाचे फोटो आणि 3D view तिकीट बुक करतानाच त्यांच्याच साईटवर उपलब्ध होते. पण एखादा सिनेमा थिएटरमध्ये पाहणं आणि मोबाईलवर पाहणं हा जितका फरक असतो तितकाच फरक 3D view आणि प्रत्यक्ष हॉल यांच्यात होता. अकराशेहून अधिक प्रेक्षक क्षमता, मोजताना काऊंट हरवावा इतके स्टेज आणि ऑडिअन्स लाईट्स, स्टॉलपासून बाल्कनीपर्यंत उंचीची असलेली ध्वनिव्यवस्था.... इतक्या भन्नाट सज्जतेचे फोटो काढल्याशिवाय रहावलं नाही. अर्थातच प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणारं ते सौंदर्य कॅमेऱ्यात आलं नाहीच !
अखेर कार्यक्रम सुरू झाला. थीम होती Midnight Ragas. आधी बुधादित्य मुखर्जी यांचं 'दरबारी कानडा' रागात सुंदर सतारवादन झालं आणि मग ज्याची सर्व रसिक अत्यंत आतुरतेने वाट बघत होते तो क्षण जवळ येऊन पोचला. तानपुऱ्यावर बसणार असलेले पंडितजींचे जपानी शिष्य ताकाहिरो आराई, तबल्याची साथ करणारे पंडित योगेश समसी आणि शिवजींचे सुपुत्र आणि शिष्य संतूरवादक राहुलजी शर्मा यांचं स्टेजवर टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत झालं आणि नंतर चौथ्या क्रमांकावर सचिन किंवा आता विराट येताना होतं तसं टाळ्यांच्या न थांबणाऱ्या कडकडाटात स्टँडिंग ओव्हेशन घेत साक्षात निळा कुडता परिधान केलेले पंडित शिवकुमार शर्मा मंचावर सावकाश पावलं टाकत आले...
सगळी वाद्य स्वरात मिळवून झाल्यानंतर एक आविष्कार साकार होऊ लागला. पंडितजींनी राग जोग निवडला होता. संतूरसारख्या कर्णमधुर नादनिर्मिती करणाऱ्या वाद्याला पखावजी पद्धतीच्या तबला वादनाची साथ खास पद्धतीचा डग्गा वापरून योगेशजी करत होते. पितापुत्रांची अप्रतिम जुगलबंदी संपूर्ण सभागृह प्राण कानांत आणून जणू ऐकत असावं. अशा उच्चतम वादनाला तबल्यावर योगेशजींची सुरेख साथ आणखी वेगळ्याच उंचीवर नेत होती. मध्येच राहुलजींनी संतूर वाजवायचे एका हातातले कलम (काठी) बाजूला ठेवून हाताने संतूरच्या तारांवर आघात करत केलेलं वादन मला एका कुठल्याश्या कलेच्या उच्चतम पातळीची अनुभूती देऊन गेलं. क्षणाक्षणाला दोन्ही संतूर आणि तबला प्रतिभेचे नवनवे कळस पेश करत होते. आणि एका बिंदूवर समेवर आलेली तिहाई.... त्या समेच्या बिंदूचा क्षण वर्णन करण्यापलीकडचा होता. संपूर्ण सभागृह कानठळ्या बसतील इतका टाळ्यांचा कडकडाट करू लागलं, आणि बेभान होऊन तो कडकडाट चालूच राहिला... जोग रागानंतर त्यांनी राग नंद सादर केला.
शेवटच्या भागात जम्मूमधल्या (पंडितजींचं जन्मस्थान) लोकगीतातली एक धून घेऊन त्यावर शिवजींनी स्वतःच्या कौशल्याने भर घालून पहाडी रागात केलेला वादन सादर केलं. यथावकाश कार्यक्रम संपला... संपू नये असं वाटत होतं तरी संपला. स्टेजवरून उठून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत मंचावरून उतरून पंडितजी बाहेर ग्रीनरूमकडे जाऊ लागेपर्यंत स्टँडिंग ओव्हेशन आणि टाळ्या थांबल्या नाहीत. पहाडी रागातली ती धून डोक्यात वाजतच भारावलेल्या अवस्थेत आम्ही बाहेर आलो. श्रोत्यांतले फक्त भारतीयच नव्हे तर उपस्थित युरोपीय श्रोत्यांच्यातही हे भारावलेपण होतं. पंडितजींबद्दल नव्यानेच कळलेला आणि त्यांना पहिल्यांदाच ऐकलेला त्यातलाच कोणी एकजण सोबतच्या भारतीयाला घेऊन शिवजींना भेटण्यासाठी धावला. अशा प्रकारे थोरामोठ्या परम वंदनीय प्रतिभावंतांमुळे भारतीय संगीत, त्याची थोरवी, त्याची अलौकिकता भाषेचं बंधन तोडून जगभरात पोचत असल्याचं पाहून एक आंतरिक समाधान वाटत होतं.

'देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती
वाळवंटातूनसुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पार्‍यासारखे'

बोरकरांना या ओळी अशाच अनेक प्रतिभावंतांकडे पाहून सुचल्या असाव्यात.

फक्त संतूर मॉम्स नाही, संतूर वादकही त्यांच्या कलेतून चिरतरुण राहत असावेत... 😊

-कौस्तुभ दीक्षित

Friday, October 18, 2019

May Indian classical music live forever - 2




मध्यंतरानंतर पुढचा कार्यक्रम होता कला रामनाथ यांचं व्हायोलिन वादन. मी ऐकलेला बहुधा तबला आणि पेटीव्यतिरिक्त हा पहिलाच वादन कार्यक्रम असावा. मागे म्हटल्याप्रमाणे तबल्यावर साथीला होते पंडित योगेश समसी. पहिल्या रांगेतल्या सर्व ज्येष्ठश्रेष्ठ कलाकारांना वंदन करून कला रामनाथांनीं व्हायोलिनच्या तारांवर राग चंद्रकंस छेडला. प्रत्येक कलाकाराची सादरीकरणाची एक पद्धत, रादर एक 'स्टाईल' असते. भीमसेनजींसारख्या मोठे कलाकारात त्यांचा आब दिसतो,  राहुल देशपांडेंचं वीज कडाडल्यागत गायन, महेश काळे श्रोत्यांना सोबत घेऊन जाणारं गाणं, झाकिरभाईंचा सुज्ञ-अज्ञ अशा सर्व रसिकांचा आ वासत जिंकत जाणारा तबला आणि असे अनेक ! कला रामनाथ यांच्याकडे बघून पहिला नजरेत भरला तो त्यांचा साधेपणा ! अर्थात 'साधेपणा' आणि 'नजरेत भरला' या दोन विरोधी गोष्टी झाल्या. कदाचित तो माझ्या receptionचा दोष असू शकेल. पण त्यांना बघितल्या बघितल्या कुणीतरी आपल्याच घरातली एखादी ताई-काकू-आत्या-मावशी वाटावी इतका साधेपणा, वादन करताना चेहऱ्यावर एक मंद स्मित आणि तल्लीनता. योगेशजींच्या साथीच्या तबल्याला मधूनच जाणारी एखादी दाद आणि त्यातून दिसणारा साथीच्या ज्येष्ठ कलाकाराबद्दलचा आदर. आणि अर्थातच विलंबित लयीतून हळूहळू द्रुताकडे जाणारं कमाल वादन !! अहाहा, शास्त्रीय संगीताचं ज्ञान नसलं पण रसिक कान असतो. मनात  कलाकार' या व्यक्तीबद्दल आदराची भावना असते. शिवाय नवीन काही अनुभवण्याची इच्छा असते. हे सगळं असलं की ही जाणीव असते की शास्त्रीय कसोट्यांवर  समोरच्या कलाकाराला तोलायची आपली पात्रता नाहीच नाही, पण त्या मैफिलीचा रागदारीपलीकडे आस्वाद घेता येतो, as a whole package. तसा आस्वाद घेता घेता जाणवलं की 'व्हायोलिन हे करुण स्वर उत्पन्न करणारं वाद्य आहे' हा समज असे मोठे कलाकार खोटा पाडतात. व्हायोलिनच्या त्या तारांनी निर्मिलेल्या त्या स्वरात तरंगत आम्ही घरी आलो.

-कौस्तुभ दीक्षित

May Indian classical music live forever - 1

परदेशात राहून 'आपलं' काही शोधत असताना जर ते 'आपलं' काही अगदी मनापासून हवंहवंसं वाटत असेल तर ते मिळाल्याशिवाय रहात नाही. कलाप्रेमी व्यक्ती सोबत असण्याचा फायदा होतो. फेसबुकवर स्क्रोल करताना प्रांजलीच्या News Feed मध्ये 'Darbar Festival' असंच आलं. स्थळ होतं 'बार्बिकन सेंटर', लंडन. लगोलग त्यांच्या साईटवर जाऊन या फेस्टिव्हलमधल्या कार्यक्रमांची यादी बघितली आणि त्यापैकी दोन दिवस जायचं ठरवलं. गुरुवारी Tabla Grooves आणि कला रामनाथ यांचं व्हायोलिन वादनअसे दोन कार्यक्रम होते, तर रविवारी पंडित बुधादित्य मुखर्जी यांचं सतार वादन आणि त्यानंतर साक्षात शिवकुमार शर्मा आणि राहुल शर्मा यांचं संतूरवादन !! शिवाय कला रामनाथ आणि शिवकुमार शर्मा-राहुल शर्मा या दोन्ही कार्यक्रमांना तबल्यावर साथीला साक्षात पंडित योगेश समसी.
खरं तर गुरुवारचा कार्यक्रम मुख्य हॉलमध्ये नव्हता. मुख्य सेंटरच्या बाजूच्या Milton Court नावाच्या इमारतीच्या हॉलमध्ये होता. त्या हॉलमध्ये शिरल्यावर तिथली प्रकाशयोजना बघूनच थक्क व्हायला झालं ! बाजूच्या इमारतीच्या हॉलमध्ये जर अशी प्रकाशयोजना व्यवस्था असेल तर मुख्य हॉलमध्ये काय असेल ! हॉलमध्ये पाण्याच्या बाटलीव्यतिरिक्त खायलाप्यायला परवानगी नव्हती (आणि लोकही ते पाळत होते). बॅगेत जरी खाद्यपदार्थ असले तरी अडवलं जात नव्हतं पण ते कुणी खातही नव्हतं.
आयोजकांच्या छोटेखानी भाषणानंतर साक्षात शिवकुमार शर्मा यांनी दीपप्रज्वलन केलं. शुभ्र केसांचे तेजस्वी पंडितजी मंचावर आले तेव्हा सर्व रसिक श्रोत्यांनी टाळ्यांचा अक्षरशः कडकडाट केला. दीपप्रज्वलन आणि सर्व कलाकार-आयोजकांना शुभेच्छा देऊन महोत्सवाची सुरुवात झाली. समोर पहिल्या रांगेत या महोत्सवात सादरीकरण करणारे सर्व कलाकार स्थानापन्न होते. Tabla Grooves हा पहिला कार्यक्रम सुरू झाला. कलाकार होते कौशिक कोनवर, गुरुदयेन रयत आणि पंडित परिमल चक्रबोरती. यात त्यांनी आपल्या सादरीकरणात एक अभिनव पद्धत वापरली. प्रत्येकी २ सुरांचे तबले प्रत्येक कलाकाराने वापरले. एक तबला खालच्या सुरातला आणि एक वरच्या. प्रत्येकाच्या तबल्यांत साधारण अर्धा ते एक सुराचा फरक. वाजवताना काही बोल एका तबल्यावर, काही दुसऱ्या असं वादन केलं. किंवा वरच्या स्वरातल्या तबल्यावर वाजवताना काही बोल खालच्या स्वरातल्या तबल्यावर असा वेगळा पण श्रवणीय प्रयोग केला. माहीत नाही की हा असा तबला तरंग सारखा प्रयोग हल्ली किंवा पूर्वीपासून करतात की कसं ते पण आवडून गेला ! तीनताल, झपताल, आडा चौताल अशा तालांत पेशकार, कायदे, रेले, तुकडे असं कधी विलंबित, कधी मध्य पण बहुतेक द्रुत अशी अफाट लयकारी तिघांनी सादर केली. मला आधी माहीत नसलेल्या या तिघांचा कार्यक्रम अनपेक्षितपणे आवडून गेला.

 -कौस्तुभ दीक्षित

Scottish Diary -2



#ScottishDiary
तुम्ही समुद्राजवळच्या ठिकाणी रहात असलात आणि जर तुम्हाला समुद्र आवडत असेल तर कितीही वेळासमुद्रावर गेलं तरी त्याच्याबद्दल तितकंच आकर्षण वाटतं हे अगदी खरं आहे. त्यामुळे माझ्यातलामूळ मुंबईकर प्रांजलीतल्या पुणेकराइतकाच Dunbarच्या समुद्रकिनाऱ्यावर जायला उत्सुक होता. त्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे समुद्रावर गेलो. East Beach पासून सुरुवात करून पश्चिमेकडे आणखी थोडे समुद्राच्या कडकडेने पुढे पश्चिमेकडे चालत गेलो. East Beach तसाया भागातलाथोडा अपरिचित Beach. अगदीच गर्दी नाही. खरं तर त्याला Beach म्हणावं इतकाही नव्हता. कधी पक्का रस्ता तर कधी चक्क पायवाट असे अर्धा तास चालत आम्ही समुद्रावर गेलो. एक खडकाळ भाग, पुढून जाणारी एक शेवाळलेली पायवाट आणि समुद्र असा भाग ! कडेकडेने चालत चालत Victoria Harbour पाशी गेलो. तिथे लागलेल्या काही छोट्या बोटी, Sea Adventure स्पोर्ट्स करणारे काहीजण, आणि थोडेफार आमच्यासारखे tourists असं वगळता फार कोणी नव्हतं. या भागात फोटोंची हौस भागवून घेतली. Dp मटेरियल, Cover मटेरियल असे नवपरिणित जोडपेपणसार्थ करणारे फोटो, सेल्फी काढले. पुढे जाऊन तिथल्या भग्न किल्ल्यापाशी एक प्रचंड खडकाळ असा भाग दिसला आणि तिथे जायला मस्त पायऱ्या वगैरे दिसला. लग्नात माझी वरात काढू दिली नाही, पण इथे बायकोची वरातच काढली. "कौस्तुभ खूप चालवेल अगदी पाय दुखेपर्यंत" या आपल्या सासूबाईंच्या इशाऱ्याचा प्रत्यय प्रांजलीला इकडे आला. त्या खडकांवरून मी बेडकासारख्या उड्या मारत होतो, पण दोघांसाठी म्हणून ते एकंदरीत कठीण प्रकरण दिसू लागल्यामुळे पाय आवरते घेतले. केलेली इतकी सगळी कसरत आणि दुपारचं ऊन यांनीपोटातल्या कावळ्यांना बोलवायला सुरुवात केली. आमच्या आवडत्या 'मुंबई-पुणे-पुणे' सिनेमात मुक्ता म्हणते तसं "प्रेमाने पोट नाही भरत". त्यामुळे ती जाणीव झाल्यानंतर गपगुमान समुद्राची हौस भागवून त्या कावळ्यांना घास (मुद्दाम वेगळा शब्द नाही वापरत) शोधण्यासाठी शोधाशोध सुरू केली. तसं घराजवळच्या McDचा शोध लागला होता, पण तिथे जायला अर्ध्या तासाहून जास्त वेळ लागला असता. Indian Restaurant दुपारी दोन वाजता बंद झालं होतं (मालक मूळ पुणेकराचा भाऊ असावा). सुदैवाने Italian Restaurant सापडलं. ही Italian Restaurants शाकाहाऱ्यांसाठी वरदान असतात. तिथल्या Veg Delight पिझ्झ्यावर आडवा हात मारला आणि भरलेल्या पोटाने घरी आलो. पण समुद्र म्हणावा असा अनुभवायला मिळाला नव्हता. जे पाहिलं तो सगळा खडकाळ Beach. त्यामुळे सोमवारसाठी तिथला प्रसिद्ध Belhaven Beach हा Sand Beach नक्की केला.

कौस्तुभ
२७-ऑगस्ट-२०१९