Labels

Friday, August 16, 2019

Science fiction to reality


बहुधा एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीचं कुठलं तरी वर्ष असेल. 'छात्र प्रबोधन' मासिकाच्या एका वर्षीच्या दिवाळी अंकात (बहुधा) जयंत नारळीकरांची एक विज्ञानकथा प्रसिद्ध झाली होती. किती वर्ष पुढच्या काळातली होती ते आठवत नाही पण भविष्यात घडणारी कथा होती ती. त्यात सुरुवातीला एक आजोबा आणि दोन नातू अशी पात्रं होती. आजोबा त्यांच्या लहानपणच्या गोष्टी सांगत असतात. 'मुंबई-पुणे प्रवासाला साडेतीन-चार तास लागायचे'. आज एक-दीड तास लागणाऱ्या प्रवासाला तेव्हा साडेतीन-चार तास का लागायचे याचं नवल त्या भविष्यातल्या नातवंडांना वाटतं. मध्यंतरी मुंबई-पुण्यादरम्यानच्या सुपरफास्ट 'व्हर्जिन हायपरलूप'ची घोषणा झाली तेव्हा, तसंच मे-जूनमध्ये मुंबई-पुणे इंटरसिटीच्या प्रवासाचा अर्धा तास कमी झाल्याची घोषणा झाली तेव्हा जयंत नारळीकरांच्या या विज्ञानकथेची प्रकर्षाने आठवण झाली होती. नारळीकरांच्या कथेतला तो दिवस फार दूर वाटत नाही.

आता पुन्हा याची आठवण व्हायचं आणखी एक कारण म्हणजे रिलायन्स जिओफायबरची घोषणा ! त्यातली घरबसल्या फर्स्ट-डे फर्स्ट-शो सुविधा जाहीर झाली आणि पुन्हा नारळीकरांची तीच विज्ञानकथा आठवली. त्याच कथेतला दुसरा उल्लेख आठवला. आपल्या काळातल्या आठवणींत रमून जाणारे तेच आजोबा नातवंडांना सांगतात, 'आम्ही थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायचो'. लोकांचा समूह एका हॉलमध्ये जाऊन एकत्र सिनेमा बघतो ही कल्पनाच त्या कथेतल्या भविष्यातल्या नातवंडांना अचंबित करणारी होती.

काही शास्त्रज्ञ-विज्ञानकथालेखक द्रष्टे असतात हेच खरं ! (खरं तर ते द्रष्टे असतात म्हणूनच ते शास्त्रज्ञ-विज्ञानकथालेखक असतात असं म्हणायला हरकत नाही 🙂)

-कौस्तुभ

No comments:

Post a Comment