प्रसंग # १ :
स्थळ : शिवाजी पार्क
वर्ष २००५
गीतारामायणाला ५० वर्ष झाल्यानिमित्ताने शिवाजी पार्कात गीतारामायणाचा भव्य कार्यक्रम करण्यात आला होता (गीतरामायण ५० : ज्योतीने तेजाची आरती). या कार्यक्रमात माझी गीतरामायणाशी पहिल्यांदा ओळख झाली. २ दिवस चाललेल्या या कार्यक्रमात अनेक नावाजलेल्या गायकांनी गीत रामायणातली ५६ गाणी सादर केली. या कार्यक्रमाला श्रीधरजी फडके पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी गीत रामायणातलं अतिशय प्रसिद्ध गीत 'माता न तू वैरिणी'. गाणं म्हणजे एखादा कोमल कलाविष्कार अशी समजूत असलेल्या मला त्या गाण्याच्या सादरीकरणाने श्रीधरजींनी तीनताड उडवलं ! कार्यक्रम संपला, पण सर्वात जास्त लक्षात राहिलं ते श्रीधरजींनी सादर केलेलं हेच गाणं !
प्रसंग # २ :
स्थळ : शिवाजी मंदिर, दादर की यशवंत नाट्यमंदिर माटुंगा नक्की आठवत नाही. श्रीधरजींच्या स्वरचित गाण्यांचा कार्यक्रम होता. त्यात त्यांनी सादर केलेली सगळी गाणी माझ्या संग्रही असलेल्या बाबूजींचं आत्मचरित्र 'जगाच्या पाठीवर' या पुस्तकात शेवटच्या पानावर लिहून घेतली. प्रतिभावान वडिलांच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची शैली निर्माण केलेला हा संगीतकार-गायक मृदू आणि सौम्य स्वभावाचा, पण माझ्या बुजऱ्या स्वभावामुळे भेट न घेता परतलो.
प्रसंग #३
स्थळ : शिवाजी मंदिर, दादर
बाबूजी सुधीर फडके यांच्या ११व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने श्रीधरजी फडके यांच्या कंठातून गीत रामायण ऐकायचा योग २७ आणि २८ जुलैल २०१३ रोजी आला. असा कार्यक्रम होणार आहे याची माहिती असल्यामुळे तिकीटविक्री सुरु होताच लगेच जाऊन तिकीट काढलं. बाबूजींचा प्रत्यक्ष कार्यक्रम बघायला/ऐकायला मिळाला नाही पण श्रीधर फडकेंच्या तोंडून ऐकायची संधी यावेळी होती. कार्यक्रम ऐकताना खरंच बाबूजींचा वारसा पुढे चालवण्याचं शिवधनुष्य श्रीधरजींनी किती समर्थपणे पेललंय ह्याची प्रचीती आली. सुधीर फडकेंनंतर गीत रामायणाचा वारसा पुढे चालवण्याचा वसा कोणी घ्यावा तर श्रीधर फडकेंनीच !!
कार्यक्रम श्रीधरजींकडे गेलो. बाबूजींचं आत्मचरित्र 'जगाच्या पाठीवर' वर मला श्रीधरजींची सही हवी होती. यामुळे यावेळी मात्र त्यांना भेटायला गेलो. त्यांना सही द्यायची विनंती केली. ते म्हणाले, "यात मी सुरुवातीला प्रस्तावना लिहिली आहे त्यावर सही करतो". असं म्हणून त्यांनी स्वतःहून ते पृष्ठ काढलं आणि त्यांच्या नावाखाली स्वाक्षरी केली. आणि अनपेक्षितपणे मला उद्देशून म्हणाले, "अशी तरूण मंडळी येतात कार्यक्रमाला, बरं वाटतं". आयुष्यात काही क्षण किंवा अनुभव सुरेख, अप्रतिम, अविस्मरणीय अशा शब्दांपलीकडचे असतात आणि त्यांची खरी किंमत फक्त तो क्षण अनुभवणाऱ्या त्या व्यक्तीलाच माहीत असते…. अशांपैकी हे क्षण होते. तो मृदू स्वभाव, सौम्य वाणी पुन्हा मनात भरली.... त्यांना चरणस्पर्श करून परतलो...
प्रसंग #४ :
स्थळ : इंदिरानगर संगीत सभा, बेंगळुरू
पुन्हा एकदा श्रीधरजी फडकेंच्या स्वरचित गाण्यांचा कार्यक्रम... दिनांक : २८ ऑक्टोबर २०१७.
पुन्हा एकदा तसंच भरलेलं सभागृह, भारलेलं वातावरण... श्रीधरजींचा आवाज अप्रतिम लागलेला... एकामागे एक गाणी सादर होत होती. श्रोते अक्षरशः कानात साठवून घेत, टाळ्यांचा कडकडाट करत दाद देत होते. या कार्यक्रमात एक गाणं बेंगळुरूचे श्री. केदार कुलकर्णी यांनी solo सादर केलं. ते सादर करण्याच्या वेळी श्रीधरजींनी त्यांना पुढे बोलावलं आणि स्वतः शांतपणे तबलजींच्या बाजूला जाऊन बसले. गाणं सादर होत असताना स्वतः श्रोत्याच्या भूमिकेत शिरून अतिशय तल्लीन होऊन ठेका धरत होते, एखाद्या जागेला मान हलवून दाद देत होते. आपण एक ज्येष्ठ गायक-संगीतकार आहोत असा आव या प्रसंगीच काय संपूर्ण कार्यक्रमभर कधीच नव्हता. वास्तविक ते इतके थोर कलाकार, स्वरतीर्थ सुधीर फडके यांचे चिरंजीव, स्वतः बाबूजी, आशा भोसले, सुरेश वाडकर अशा ज्येष्ठश्रेष्ठ गायकांनी त्यांची गाणी गायलेली... पण या सर्वाचा लवलेशही कुठे नव्हता !! यावेळी काही कामानिमित्त लवकर जायचं असल्यामुळे भेटता आलं नाही.
प्रसंग #५ :
दिनांक : ५ नोव्हेंबर २०१७
इंदिरानगरचा कार्यक्रम झाल्यानंतर फेसबुकवर छोटंसं पोस्ट लिहिलं. त्यात या कार्यक्रमाचा, श्रीधरजींच्या आधी घेतलेल्या भेटीचा उल्लेख केला होता. त्यांच्यातलं मला भावलेलं लिहिलं होतं. हे लेखन माझ्या वॉलवर आणि इतर काही ग्रुप्स वर पोस्ट केलं होतं. त्यापैकी स.न.वि.वि. ग्रुपवरच्या श्री. अजय पुराणिक यांच्यामुळे सुकन्या जोशी यांच्याद्वारे श्रीधरजींपर्यंत पोचलं. त्यांनी स्वतःहून चौकशी केली.
"श्री कौस्तुभ दीक्षित ह्यांनी लिहिलेली आमच्या बंगळुरू येथे दि 28 ऑक्टोबरला झालेल्या
" फिटे अंधाराचे जाळे " कार्यक्रमावरची प्रतिक्रिया वाचली।
आपण ती सौ सुकन्या जोशी ह्यांना पाठविली व त्यांनी मला पाठविली।
मनःपूर्वक धन्यवाद।
श्री दीक्षित ह्यांचा दूर ध्वनि क्रमांक देऊ शकाल का।
त्यांनाही धन्यवाद द्यायचे आहेत।"
श्री. अजय पुराणिक व सौ. श्रद्धाताई सौदीकर यांच्यामुळे ही गोष्ट मला कळली आणि मी माझा नंबर दिला. अजयजींनी मला श्रीधरजींचा नंबर दिला . धडधडत्या छातीने नंबर सेव्ह केला. त्यानंतर कितीतरी वेळ फोनकडे लक्ष जात होतं. दुसऱ्या दिवशी भूतान ट्रिपसाठी काही खरेदी करायला बाहेर पडलो असता एका दुकानात होतो. अचानक फोन वाजला.... "Shridharji Phadke Calling ...". धडधडत्या छातीने कॉल उचलला. पलीकडून तोच मृदू आवाज कानांवर पडला.
"नमस्कार, मी श्रीधर फडके बोलतोय मुंबईहून. कौस्तुभ दीक्षित का ?"
त्या क्षणाची महती काय वर्णावी देवा... आयुष्यात पूर्वी काहीतरी फार पुण्यकर्म केली असावीत म्हणून त्या वर बसलेल्याने अशा काही क्षणांचं दान आमच्या पारड्यात टाकलं....
"तुम्ही फेसबुकवर लिहिलंत माझ्याबद्दल ते वाचलं. म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यायला फोन केला. खरंतर मी इतक्या कौतुकाला पात्र आहे की नाही मला माहीत नाही. खूप आभार तुमचे."
"त्यादिवशी भेटायला नाही आलात का ?"
मी : नाही, जरा लगेच जायचं होतं त्यामुळे नाही भेटू शकलो."
"पुढच्या वेळी नक्की या भेटायला."
मी : तुम्हाला काही वर्षांपूर्वी एकदा शिवाजी मंदिरला तुमच्या कार्यक्रमाला भेटलो होतो तेव्हा "जगाच्या पाठीवर" वर तुमची सही घेतली होती."
"ओह, नाही पण मला नाही आठवत हो चेहरा."
मी : "अहो श्रीधरजी, नाही ठीके खूप जुनी गोष्ट आहे."
मग काय करता, कुठे राहता वगैरे चौकशी केली. software engineer म्हटल्यावर 'मीही होतो computer क्षेत्रात' असं सांगितलं आणि मूळचा मुंबईचा आणि त्यातही माहीम म्हटल्यावर अगदी 'कटारिया रोड का ?' इथपर्यंत सगळं विचारलं. "माझंही घर दादरलाच आहे त्यामुळे मला तो परिसर बराचसा माहीत आहे."
मुंबईला मी २-३ महिन्यांतून एकदा येतो असं सांगितल्यावर "कधी आलात तर नक्की या भेटायला...". अशा प्रसंगी आपल्याकडचे शब्द संपतात आणि केवळ "हो, नक्की" इतकंच तोंडून कसंबसं बाहेर पडतं....
मी शिवाजी पार्कच्या कार्यक्रमापासून गीत रामायण ऐकत असल्याचं आणि कितीही वेळा ऐकलं तरी परत परत ऐकावसं वाटतं सांगितल्यावर "ती सगळी गदिमा आणि आणि बाबूजींची पुण्याई आहे. त्यांनी कामच तसं करून ठेवलंय."
शेवटी फोन ठेवताना पुन्हा एकदा धन्यवाद... नमस्कार....
मी अजून त्यांच्याबरोबर फोटो काढलेला नाही. पण अनेकदा ऐकलेल्या तृप्त मैफिली, 'जगाच्या पाठीवर'वर त्यांची घेतलेली सही, त्यांना केलेला नमस्कार,"अशी तरूण मंडळी येतात कार्यक्रमाला, बरं वाटतं" हे त्यांचे त्यावेळचे शब्द, आणि आत्ताची ही फोनवरची २ मिनिटं २० सेकंद... एका फोटोपेक्षाही फार मोठी पुंजी आहे... बाबूजी सुधीर फडके माझे सर्वात आवडते संगीतकार आणि गायक... त्यांचे सुपुत्र असलेले स्वतःही ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकार असलेले श्रीधरजी... आमच्या रसिकत्वाच्या चांदण्याला या तेजस्वी सूर्याच्या किरणांचा हा असा सोनसळी अभिषेक एका फोटोच्या फ्लॅशहून जास्त उजळून टाकणारा आहे...
कौस्तुभ दीक्षित
३० डिसेंबर २०१७
No comments:
Post a Comment