Labels

Tuesday, April 11, 2017

घेई छंद...

मायदेश आणि संस्कृती यांपासून आठ महिन्यांपेक्षा अधिक काळ चार-पाच हजार मैल दूर रहात असताना अधूनमधून होणारे छोटे छोटेसे भेटींचे कार्यक्रम आपल्या भयंकर सांस्कृतिक भुकेला पुरेसे नसतात. त्यासाठी ‘जेवण’ नाही, ‘मेजवानी’चीच आवश्यकता असते (इथे वर्षभराहून अधिक काळ किंवा कायमचे देशाबाहेर असणाऱ्यांना आधी साष्टांग दंडवत !). पुस्तकं नेता येतात किंवा सिनेमे कुठेतरी ऑनलाइन मिळणं कामचलाऊ असतं, पण कार्यक्रम हे प्रत्यक्ष जाऊनच अनुभवावे लागतात. ती अनुभूती लॅपटॉपवर येत नसते. आणि जेव्हा असा एखादा कार्यक्रम असल्याचं कळतं, तेव्हा त्या कार्यक्रमाला न जाणं म्हणजे माझ्यासाठी महापाप ! असाच एक कार्यक्रम लंडन नगरीत होणार असल्याचं कळलं. सादरकर्त्या विभूती म्हणजे साक्षात सुबोध भावे, महेश काळे आणि राहुल देशपांडे असताना जायचं टाळणं म्हणजे श्रीखंड, बटाट्याची भाजी आणि वरण-साजूक तूप-मीठ-लिंबू भात यांनी भरलेलं ताट नाकारण्यासारखं झालं असतं आणि ते मी करणं या जन्मात तरी शक्य नव्हतं. त्यामुळे दीड-दोन महिने आधीच तिकीट काढून ठेवलं. अखेर ९ एप्रिलचा तो दिवस उगवला आणि (कधी नव्हे ते) कार्यक्रम सुरू व्हायच्या वेळेआधी १० मिनिटं अस्मादिक कार्यक्रम स्थळी प्रवेश करते झाले.
कार्यक्रम थोडा उशीराच सुरू झाला. पण जेव्हा सुरू झाला त्या क्षणापासून त्या हॉलपलीकडच्या जगाचं अस्तित्त्व विसरायला झालं. नुकत्याच दिवंगत झालेल्या थोर शास्त्रीय संगीत गायिका किशोरीताई आमोणकर यांच्या सुप्रसिद्ध ‘सहेला रे’ ने झाली आणि त्यानंतर ‘रागमाला’. अखंड त्रेपन्न मिनिटं त्या स्थळी फक्त शुद्ध शास्त्रीय संगीत भरून राहिलं होतं.
किशोरी ताई, अभिषेकी बुवा, वसंतराव देशपांडे, लता मंगेशकर, शांता शेळके, पाडगावकर, विंदा करंदीकर, सुधीर फडके, गुलजार, मेहदी हसन, जगजित सिंग अशांपासून अरिजित सिंग आणि वैभव जोशींपर्यंतचे कित्येक जुने-नवे दिग्गज असे समोर तीन माणसांतून व्यक्त होत असताना समोरच्यांची ‘अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने’ अशी अवस्था झाली नसती तरच नवल....
या मेजवानीत पोळीसारखं processed शास्त्रीय संगीत, पहिला भात-मधला भात-ताकभातासारखं नाट्यसंगीत, भाजीसारखं चविष्ट भावसंगीत कोशिंबिरीइतक्या कविता, लोणच्याइतकी तोंडी लावायला इंग्लिश गाणी, पापडासारखी आणि पापडाइतकीच मसालेदार हिंदी गाणी.... अहाहा.... असं खुसखुशीत, चविष्ट आणि आरोग्यपूर्ण जेवण तिन्ही कलाकार आम्हाला घ्या-घ्या म्हणून आग्रह करकरून वाढत असताना ते जर आम्ही नाकारत असतो तर आमच्यासारखे कपाळकरंटे आम्हीच ठरलो असतो. आणि शेवटी डेझर्ट्ससाठी कट्यार चित्रपटातल्या गाण्यांच्या थरांचा केक आणि सर्वात शेवटी वर ‘कानडा राजा पंढरीचा’च्या जुगलबंदीची Cherry on the cake... एवढं पोटभर जेवण चारपाच तास जेवल्यावर, एवढं ‘सूरा’पान केल्यावर सुस्ती, धुंदी येणं हे अनिवार्य होतं. घरी परत येताना पाय, ट्रेन, बस वगैरे निमित्तमात्र.... त्या सुरांवरच तरंगणंच खरं !
विशेष उल्लेख नेहमीप्रमाणे ‘मन मंदिरा’ गाण्यात श्रोत्यांना गातं करणं , जिथे श्रोते स्वतः मैफिलीचे सादरकर्ते होतात. हाच momentum पुढे नेत जेव्हा कानडा ‘राजा पंढरीचा’ला जेव्हा “विठ्ठल विठ्ठल” घोषात, टाळ्यांच्या तालावर मैफिलीचा उच्चबिंदू गाठला जातो त्याच बिंदूला ही भरलेली, भारलेली, बहरलेली, रंगलेली मैफिल संपते. पण प्रेक्षक, सादरकर्ते गेल्यानंतरही त्या परदेशातल्या हॉलच्या भिंतीभिंतीत, खुर्चीखुर्चीत आणि मंचावरसुद्धा भारतीय संगीताचा ठसा उमटून राहिला असेल.
घरापासून इतक्या लांब असूनही घराजवळ असण्याची अनुभूती देणारी ही Virtual Reality कुठल्याही तंत्रज्ञानाइतकीच सक्षम होती. आम्हाला घरापासून इतक्या दूरवर ही अनुभूती दिल्याबद्दल ‘घेई छंद’च्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार !!

-कौस्तुभ दीक्षित
१० एप्रिल २०१७

1 comment: