रोजच्या कामाच्या ओझ्याने आपण थकलेले असतो. अशा वेळी आपल्या मनाला उभारी देणं आपल्याच हातात असतं.
कंटाळल्या जिवा हवे विसाव्याचे क्षण
थकलो वाहून मी ओझे मण मण
भरलेल्या मेघापरी भरून आले मन
व्यापूनही रिते सारे उरतसे जीवन
मध्येच चमके वर आभाळात वीज
वाटले जा धाव मना पावसात भिज
तोड ती बंधने सारी तोडी त्या शृंखला
जा नाच ज्याने रमे जीव थकला एकला
जा धाव असा काही करी वाऱ्याशी शर्यत
ठेव दुर्दम्य आशा ज्याने हलेल पर्वत
त्याच उमेदीने घेई आकाशी भरारी
ओलांडून त्याला कर पुढे अवकाशी स्वारी
दूरवर कुठेतरी आरतीचा घंटानाद
लयीचा उन्माद तुला घालतसे साद
चल उठ उठ स्थिर असा बसशी आता का
लावी कर्तृत्वाने तुझ्या कीर्तीच्या पताका
भिनव वेग पावसाचा बाणव विजेचे चैतन्य
धावी वाऱ्याच्या वेगाने सारोनिया औदासिन्य
चराचर उत्फुल्लित त्याची प्रेरणा घेऊनिया
घेई कवेत आकाश सारी तुझीच दुनिया
सार आजची काळोखी दूर ढकल मळभ
तुझ्या किरणांची दीप्ती उद्या उजळेल नभ
No comments:
Post a Comment