Labels

Wednesday, December 21, 2016

The English Winter #2

आधी स्वेटर कपाटातून बाहेर आले, मग एक एक करून जॅकेट, थर्मल्स, कानटोपी, हँडग्लव्ह्स अशी एक एक आयुधं बाहेर निघू लागली. ‘नेमेची येतो मग हिवाळा’ किंवा ‘Winter is coming’ उक्तीला जगून थंडीने आपला दरारा दाखवायला सुरुवात केली. GoTमध्ये थंडीला उगाच घाबरत नाहीत लोक ! Whitewalkers हे एक कारण आणि थंडी हे दुसरं.
धुक्याचं साम्राज्य वाढू लागलं, बहुतेक झाडं पानांविना ओकीबोकी दिसू लागली. आता थंडीचा ‘गुलाबी’ वगैरे रंग फिका पडून ती गुलाबाच्या काट्यांसारखी बोचरी झाली. गुलाबी जाऊन बर्फाचा पांढरा दिसायची वेळ आली. पारा दोन अंकी वाचन दाखवेनासा झाला. कधीतरी आदल्या रात्रीच्या जास्त उतरलेल्या पाऱ्याने दवालाही गोठवून टाकलं. एरवी बसमधून ऑफिसला जाताना हिरवी दिसणारी शेतं त्या गोठलेल्या दवाने (Frost) थेट एका रात्रीत पांढरी दिसू लागली. गाड्यांचे पांढरे झालेले टप सकाळच्या उन्हात चमकू लागले. सूर्यदेवही थंडीत स्वतःला गुंडाळून घेऊ लागल्यामुळे सकाळ साडेसातच्या पुढे होऊ लागली आणि दुपारी ३.३०-४ वाजताच संध्याकाळचे सात-साडेसात वाजल्यासारखं वाटू लागलं. परिणामी, लोकही स्वतःला घरात लवकर कोंडून घेऊ लागले. रस्ते काहीसे लवकरच सुने पडू लागले.
आता हेही रोजचंच झालं. पण जसे दिवस पुढे पुढे सरकू लागले आहेत तसतसे हळूहळू छोटे छोटे बदल दिसू लागले आहेत. लंडनची जत्रा अर्थात् Winter Wonderland सुरू झालं आहे, मॉल्स, दुकानात Discountचे बोर्ड दिसू लागले आहेत, नव्या रोषणाईने हळूहळू झाडं चमकू लागली आहेत, रस्ते रात्रीचे पुन्हा नव्याने उजळू लागले आहेत, दिवे, फुगे, इटुकल्या घंटा, रंगीत इवलेसे गोळे यांनी घरं, अंगणं आणि अगदी ऑफिसंही सजू लागली आहेत. ऑफिसात कामं संपवायची घाई होऊ लागली आहे. नव्या वर्षाची सुरुवात जोमाने करण्यासाठी त्या आधीच्या सुट्टीचे वेध लागले आहेत. प्रत्येकाच्या आतला सुप्त उत्साह आता दिसू लागला आहे. सबवेमधले भिकारी, किरकोळ विक्रेते, दुकानं, तमाम जनता, वाळलेली झाडं, दाटलेलं धुकं आणि सगळ्या चराचरालाच त्या गोंडावाल्या लाल-पांढऱ्या टोपीचे वेध लागले आहेत. दरवर्षीप्रमाणे काही दिवसांतच घरोघरी एक नवीन जन्म होईल, घरोघरी एक म्हातारबाबा गुप्तपणे येऊन जाईल. नवीन वर्ष चांगलं जाण्यासाठी घरोघर बाळाकडे प्रार्थना केल्या जातील. म्हातारबाबा भेटी ठेवून जाईल. Jesus is coming, Santa is on his way and ‘Christmas’ is just round the corner....

-कौस्तुभ दीक्षित
(२१ डिसेंबर, २०१६)

Saturday, December 17, 2016

|| दुभंग ||

आमुचीच भुते | आमुच्याच वर |
परतून वार | तोच जुना |


आमुच्यासाठी जी | उलटी पावले |
आज मिरविती | शुभचिन्हे |


आमुच्या गळ्याला | चिरून मरण |
दुसऱ्यांच्या कंठी | मणिहार |


आम्हालागी झोंब | लिंबू मिरचीची |
कुणीसे लाभार्थी | साखरेचे |


राशीला आमुच्या | मंगळ नि शनी |
तिथे शुभस्थानी | शुक्रतारा |


झळाळते आज | वस्त्र जरतारी |
पांढरे निशाण | पुसोनिया |


फुटक्या घटाशी | ठोकताना बोंब |
मांडवात स्वर | मंगलाचे |


स्वर्गारूढ झाला | जरी धर्मराजा |
हिंडे तेलासाठी | अश्वत्थामा |


-कौस्तुभ
५-१२-२०१६