Labels

Monday, June 17, 2013

I HATE RAIN !!!

पाऊस  सगळ्यांनाच आवडतोच असं नाही. काहींच्या जुन्या गाडलेल्या आठवणी पावसाबरोबर जाग्या होतात…. त्याचा त्यांना त्रास होतो… आणि त्यांच्या तोंडून नकळत विरहवेदना बाहेर पडतात. अभीरही अशांतलाच एक !! पाऊस आला की त्याच्या श्रुतीसोबतच्या आठवणी पुन्हा जाग्या होतात पण आता त्यांना राधाच्या आठवणींचं त्या वेदना सुसह्य करणारं औषध मिळालं आहे. 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ही मालिका माहित असेल्यांना हे संदर्भ आणि I Hate Rain माहित असेल पण समजा माहीत नसलं तरीही या कवितेतल्या भावना नक्कीच समजू शकतील, कारण… 'कविता ह्या समजायच्याच नसतात, समजायच्या असतात त्या भावना…' :)

माझी मैत्रीण निकिता आवारे हिने व्यक्त केलेल्या अभीरच्या या पाऊसवेदना….


I HATE RAIN 
पावसाची संततधार
गोठवून टाकणारा गार वारा 
माती आणि धारांच्या मीलनाच्या आनंदाने बेभान होऊन 
रस्त्यांवरून फेसाळत वाहणाऱ्या त्या इवल्या इवल्या सरिता
हे… 
हे सगळं चुकवत 
मी दुकानाच्या शेडच्या आडोशाने उभं रहावं 
आणि आपल्याच आनंदात भुर्रकन जाणाऱ्या एखाद्या गाडीनं 
जाताना मला नखशिखांत चिखलाचा अभिषेक घडवावा 
You know what Radha 
I  HATE RAINS… !!!

ते आभाळअश्रू झेलून चिल्ल्यापिल्ल्यांनी मनसोक्त नाचताना 
मला मात्र 
फक्त त्यांच्या पायाखालचं चिखल दिसावं 
कुणी पावसात भिजायला मिळावं म्हणून छत्री घरी मुद्दाम विसरावी 
आणि मी मात्र बरसणाऱ्या सरींवर बहिष्कार म्हणून 
स्वतःच्या खोलीत बंद व्हावं 
प्रेमात पडलेल्या माझ्या मित्राला
कोसळणाऱ्या थेंबांत सप्तसुरांचा नाद गवसावा
पण मला नेहमी 
पत्र्यावर आपटून पाण्याने 'ताड् ताड्...' असा माजवलेला तांडवच दिसावा…. 
You know what Radha 
I  HATE RAINS… !!!

पावसाच्या येण्याबरोबर मग
चोरपावलांनी श्रुतीची आठवण यावी 
मित्राच्या पावसाची सरगम 
अनाहूतपणे कानी वाजू लागावी 
आणि थेंबाथेंबागणिक 
तिच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण ,मनावर कडकडून कोसळावा… 
आकाशाचं ते रुदन माझ्याच विरहकळांचा प्रतिध्वनी वाटावा… 
वाढत जाणाऱ्या पावसाबरोबर सगळं कसं असह्य व्हावं 

अचानक पाऊस थांबावा… 
पाऊसधारांत न्हाऊन निघून हवा पण अगदी स्वच्छ भासावी… 
इतका वेळ मिटलेले डोळे अलगद उघडावे… 
आणि…. 
राधा समोर तू दिसावीस… 
You know what Radha 
I…. 
-निकिता आवारे

Sunday, June 9, 2013

पाऊस - एक अतृप्त मैफिल

पावसामुळे चराचर सृष्टी मोहरून उठते, चैतन्य येतं हे जरी खरं असलं तरी एखाद्याचा जर आधीच उदास स्वर लागला असेल तर तो उदास प्राणी अजून उदास होऊन जाऊ शकतो आणि सगळं मिळूनही रिक्तपणाच उरतो फक्त !!


काय मस्त हवा सुटलीय
शरीराशी झोंबून मनाला आल्हाद देऊ पाहतेय
पावसाचे तुषार अंगाखांद्यावर नाचतायत
मी मात्र नुसता उदास उभा आहे फक्त

भोवताली अंधार दूरवर एक लुकलुकता दिवा
कानात गुंजती सूर कोणीतरी वाजवी पावा
ध्वनी-प्रकाशाचा विजोड तरी एक खेळ नवा
त्याचा एक मूक प्रेक्षक मी खेळ बघतोय विरक्त

एकटेपणाच्या कोशात माझं छोटंसं घर
बाहेर पडणारी पावसाची हळुवार सर
तरीही का लागावा आज हा दुःखी स्वर
या जगात राहूनही मी जगापासून अलिप्त

मल्हाराची मुसळधार आळवणी तर सारखीच चालू असते
मध्येच अचानक ताशासारखी आकाशात वीज कडाडते
पागोळ्यांची सुरावट तर सतत लेहरा धरतच असते
या श्रवणीय श्रावणमैफिलीतून मी मात्र मुक्त

नांदीपासून भैरवीपर्यंत ही मैफिल रंगते
उत्कटतेच्या समेवर येऊन पावसाची जुगलबंदी संपते
माझी मात्र अखेरच्याही तिहाईची टाळी चुकते
सारे काही अनुभवूनही मी मात्र अतृप्त