Monday, February 12, 2018
दिव्याचा हव्यास हवा...
Wednesday, February 7, 2018
किल्ला
भव्यतेच्या खुणा अभिमानाने मिरवलेला एक किल्ला
आज भग्नतेचं अस्तित्व नाईलाजाने वागवतो आहे.
इथे वावरलेल्या कुण्या सम्राट/महाराजाच्या जाम्यानिम्याच्या आठवणी घेऊन
आज कुणी येईल म्हणून वाट पाहतो आहे.
की त्याला सांगेन इथलं गतवैभव,
पोवाडे गाईन त्या कोण्या शासकाचे,
इथल्या अभेद्यपणाच्या कथा सांगताना बुरुजावर वाढलेल्या गवताच्या सळसळण्यातून रोमांचित होईन,
एखादा खडक कोसळल्यावर जणू तोफांचे आवाज कानात घुमतील
इथला कण अन् कण ऐतिहासिक पदस्पर्शाने पुनित होईल,
आणि मी असा माझ्या जीर्ण गात्रांत प्राण फुंकून जगाला ओरडून सांगेन की “होय, हा पहा मी अजूनही काळाचे व्रण मिरवत उभा आहे”....
पण त्या किल्ल्याचं वाट पहाणं काही संपत नाही.
आजही वाट पहात राहतो कुणी येईल याची,
पण इथल्या गावकऱ्यांनाच या किल्ल्याचा इतिहास माहीत नाही !
त्यांना ‘टेकडी’ म्हटल्यावर कळतं, कुणी ‘किल्ला’ म्हटलं की एकमेकांची तोंडं बघत बसतात.
‘अतिपरिचयात् अवज्ञा’ दुसरं काय….
किल्ला आजही वाट बघतो आहे,
पण पुरातत्व विभागाच्या एका जीर्ण पाटीशिवाय त्याच्या नशिबी दखल घेणारं कोणी आज तरी नाहीये.
घोड्यांच्या टापा आणि तोफांच्या कानठळ्या घुमलेल्या इथल्या जमिनीच्या नशिबी आज फक्त गवत-झुडपांची हलकी सळसळ आहे.
युगप्रवर्तक पराक्रमांच्या गाथा कोरलेले स्तंभ-शिलालेख आज कोरीव कामांतून आजच्या काळातल्या प्रेमकथा सांगत आहेत....
कदाचित काही वर्षांनी जमीनदोस्त झाल्यावर पुन्हा कधी उत्खनन झालंच तर इतिहासकार इथल्या पराक्रम आणि प्रेम यांच्या सहअस्तित्वाच्या कथा सांगतील.
मग किल्ला पुन्हा एकदा खिन्न हसेल,
ऊन-पाऊस-वारे-ऋतू झेलत त्याचं वाट पाहणं चालूच राहील,
आणि तिथे काळ नामक कुणी (खल)नायक छद्मी हसेल,
फक्त माणसांनाच नाही, किल्ल्यालाही प्राक्तन असतं...
-कौस्तुभ
४ फेब्रुवारी २०१८