'गीत रामायण' : प्रतिभावान लेखक, पटकथाकार, कवी, गीतकार आदरणीय 'गदिमा' यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आणि स्वररत्न बाबूजी 'सुधीर फडके' यांच्या सुमधुर कंठातून साकारलेलं हे अनोखं काव्य, काव्य नव्हे तो एक ग्रंथच !! बाबूजींच्या ११व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दादरच्या शिवाजी मंदिरात त्यांचे सुपुत्र संगीतकार, गायक श्री. श्रीधरजी फडके यांच्या कंठातून ऐकायचा योग २७ आणि २८ जुलैला आला. असा कार्यक्रम होणार आहे याची माहिती असल्यामुळे तिकीटविक्री सुरु होताच लगेच जाऊन तिकीट काढलं.
मी २००५ मध्ये शिवाजी पार्कात झालेला गीत रामायणाचा सुवर्ण महोत्सव ('गीत रामायण ५० - ज्योतीने तेजाची आरती') हा कार्यक्रम प्रत्यक्ष बघितला होता आणि तेव्हापासून गीत रामायणाचा चाहता झालो होतो. बाबूजींचा प्रत्यक्ष कार्यक्रम बघायला/ऐकायला मिळाला नाही पण श्रीधर फडकेंच्या तोंडून ऐकायची संधी यावेळी होती आणि दुधात साखर म्हणजे त्या कार्यक्रमाचं निरुपण माझ्या अतिशय आवडीच्या निवेदिका सौ. धनश्री लेले या करणार आहेत असं कळलं. तेव्हा हा दुग्धशर्करा योग चुकवायचा प्रश्नच नव्हता.याआधी रवींद्र नाट्यमंदिरात धनश्रीताईंचंच निवेदन असलेल्या ज्येष्ठ गायक मा. श्री. अरुण दाते यांच्या 'शुक्रतारा' गाण्याच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाला मी गेलो होतो. त्यातलं धनश्रीताईंचं निवेदन मला अतिशय भावलं होतं. तेव्हा त्याबद्दल त्यांना 'फेसबुक'वर मेसेज पाठवला होता. त्यांनीही Reply केला होता आणि 'एखाद्या कार्यक्रमाला भेट' असं सांगितलं होतं. त्यामुळे त्याचीही उत्सुकता होतीच !
कार्यक्रम सुरू झाला आणि वातावरण गीत रामायणाच्या मंगलमय सुरांनी भरून गेलं. 'स्वये श्री रामप्रभू ऐकती' पासून सुरू झालेला हा भारावून टाकणारा हा प्रवास पहिल्या दिवशी 'माता न तू वैरिणी' पर्यंत झाला. खरंच बाबूजींचा वारसा पुढे चालवण्याचं शिवधनुष्य श्रीधरजींनी किती समर्थपणे पेललंय ह्याची प्रचीती आली. सुधीर फडकेंनंतर गीत रामायणाचा वारसा पुढे चालवण्याचा वसा कोणी घ्यावा तर श्रीधर फडकेंनीच ! धनश्रीताईंचं निवेदन/निरुपण तर नेहमीसारखंच अप्रतिम !!
'सात स्वरांच्या स्वर्गामधुनी
नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी
यज्ञमंडपीं आल्या उतरुनी
संगमी श्रोतेजन नाहती'
याची प्रचीती ठायीठायी येत होती. श्रीधरजींचे मधुरसे स्वर आणि त्याला अतिशय अनुरूप असं धनश्रीताईंचं रसाळ वाणीतलं निरुपण यांच्या संगमी श्रोतेजन न्हाऊन निघाले नसते तरच नवल ! तो स्वर्गस्थ रामचंद्र (बाबूजी) आपल्या एकुलत्या एक कुश-लवाचं म्हणजे श्रीधरजींचं गायन नक्कीच वरून ऐकत असणार !
पहिला दिवस संपला. मी लगेच जाऊन धनश्रीताईंना भेटलो. त्यांना नाव सांगितलं. त्यांनी लगेच ओळखलं. "हो हो, तू मेसेज पाठवला होतास; चला, भेटलास आज" असं म्हणाल्या. मी त्यांना कार्यक्रम खूप आवडल्याचं सांगितलं, त्यांच्याकडे सही मागितली. "अरे श्रीधरजींची सही घे, माझी कशाला ?" त्या म्हणाल्या. म्हटलं, "त्यांची घेतोच पण तुमचीही सही हवी आहे". मग हसत हसत त्यांनी सही दिली.
मी त्यांच्यासाठी त्यांच्या काही छायाचित्रांचं एक कोलाज Design केलं होतं. ते त्यांना भेट दिलं. ते बघून तर त्यांनी एकदम उत्स्फूर्तपणे "अरे वा" अशी दाद दिली. आणि पुन्हा एकदा कोलाज नीट न्याहाळलं आणि परत एकदा तशीच दाद दिली. खूप छान वाटलं.
मग श्रीधरजींकडे गेलो. बाबूजींचं आत्मचरित्र 'जगाच्या पाठीवर' माझ्या संग्रही आहे, त्यावर मला श्रीधरजींची सही हवी होती. त्यांना सही द्यायची विनंती केली. ते म्हणाले, "यात मी सुरुवातीला प्रस्तावना लिहिली आहे त्यावर सही करतो". असं म्हणून त्यांनी स्वतःहून ते पृष्ठ काढलं आणि त्यांच्या नावाखाली स्वाक्षरी केली. आणि अनपेक्षितपणे मला उद्देशून म्हणाले, "अशी तरूण मंडळी येतात कार्यक्रमाला, बरं वाटतं". आयुष्यात काही क्षण किंवा अनुभव सुरेख, अप्रतिम, अविस्मरणीय अशा शब्दांपलीकडचे असतात आणि त्यांची खरी किंमत फक्त तो क्षण अनुभवणाऱ्या त्या व्यक्तीलाच माहीत असते…. अशांपैकी हे क्षण होते. असो. मग धनश्रीताईंचा निरोप घेऊन गीत रामायणाच्या हवेतच घरी आलो.
दुसरा दिवसही पहिल्या दिवसासारखाच मंतरलेला होता. बाबूजींच्या 'सार्वकालिक महान' अशा 'पराधीन आहे जगती' या गीताने दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. सोबतीला धनश्रीताईंचं कालिदास, भवभूतीसारख्या महाकवींपासून अगदी लोककवींच्या कविता, लोककथांच्या उदाहरणांनी नटलेलं निवेदन आणि श्रीधरजींनी बाबूजी-गदिमांचे त्याकाळचे प्रसंग, किस्से सांगणं आणि गाण्यांच्या साथीला तितकाच उच्च दर्जाचा असलेला वाद्यमेळ यातून कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
धनश्रीताईंचं निवेदन हे मला एखाद्या शांत नदीप्रवाहासारखं वाटतं. कुठे चमकदारपणा नाही. आपण त्या नदीच्या काठावर बसून फक्त निवांतपणे त्याचा आस्वाद घ्यायचा ! आणि शेवटी गंगेत स्नान केल्याचं पुण्य आणि आनंद आपल्या पदरी पडणार ह्याची खात्री :) तसंच अपेक्षेनुरूप इथेही झालं. आणि श्रीधरजींबद्दल मी काय सांगावं !! मी भक्तिगीतं ऐकणाऱ्या पंथातला अजिबातच नाही. मी स्वतःहून ऐकलेलं शेवटचं भक्तिगीत म्हणजे 'सुमन कल्याणपूर' यांचं 'केशवा-माधवा', तेसुद्धा इ. ६वीत. त्यामुळे भक्तिरसात न्हाऊन निघणं वा तत्सम प्रकार फक्त ऐकण्या-वाचण्यापुरताच मर्यादित ! पण तोही अनुभव या कार्यक्रमाने दिला.
शेवटी जिथून सुरू झाला (स्वये श्री) त्याच बिंदूला म्हणजे 'गा बाळांनो श्री रामायण'पाशी येऊन कार्यक्रम संपला. एकच गोष्ट खटकली ती म्हणजे श्रोते असायला हवेत तितके Responsive नव्हते. बहुधा ज्येष्ठ नागरिकांचाच जास्त भरणा असल्यामुळे असेल. असो. :D
पुन्हा एकदा धनश्रीताईंना भेटलो आणि कार्यक्रम आवडल्याचं सांगितलं. त्यांनीही कोलाज घरी आवडल्याचं आवर्जून सांगितलं. पुन्हा भेट कधी एखाद्या कार्यक्रमाला असं म्हणाल्या. कार्यक्रमाच्या आठवणी जागवतच घरी आलो आणि आता मोबाईलच्या Playlistमध्ये गीत रामायणाची आणखी काही गाणी Add झाली आहेत हे वेगळं सांगायला नकोच :)